25 ऑक्टोबरला ‘म्हादई प्रवाह’ची बैठक शक्य

0
2

म्हादई प्रवाह (प्रोग्रेसिव्ह रिव्हर अथॉरिटी फॉर वेल्फेअर अँड हार्मनी) प्राधिकरणाची तिसरी बैठक येत्या 25 ऑक्टोबर रोजी गोव्यात होण्याची शक्यता आहे. या बैठकीत म्हादई नदीवरील कर्नाटक सरकारकडून सुरू असलेल्या कळसा नाला प्रकल्पाची आणखी एक संयुक्त पाहणी करण्याच्या गोवा सरकारच्या अर्जावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

म्हादई प्रवाहची सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवी दिल्ली येथे आयोजित तिसरी बैठक गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती. आता, ही बैठक गोव्यात होण्याची शक्यता आहे.

म्हादई प्रवाहच्या दुसऱ्या बैठकीच्या वेळी म्हादई नदीच्या गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील संयुक्त पाहणीच्या वेळी कर्नाटकातील कणकुंबी येथील कळसा नाला प्रकल्पाची पाहणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे गोवा सरकारने प्रवाह समितीला पाठविलेल्या पत्रात कर्नाटकातील कणकुंबी येथील कळसा नाला प्रकल्पाच्या जागेची आणखी एक संयुक्त पाहणी करण्याची विनंती केली आहे. म्हादई नदीचा पाण्याचा वळविण्यात आलेला प्रवाह पूर्ववत करण्यासाठी कर्नाटक सरकारला आवश्यक निर्देश जारी करण्याची विनंतीही पत्रात करण्यात आली आहे.

केंद्रीय जल आयोगाचे प्रभारी नवीन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. प्रवाहाच्या यापूर्वीच्या दोन बैठका अनुक्रमे गोवा आणि बंगळुरू येथे झाल्या होत्या.

म्हादई प्रवाहच्या गोव्यातील बैठकीबाबत आपणाला काही कल्पना नाही. जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता म्हादई प्रवाह समितीचे सदस्य आहेत. त्यांना बैठकीबाबत सूचना पाठवली जाईल. त्यांच्याकडून आपणाला बैठकीबाबत माहिती मिळेल, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.