वेलिंगकरांना अटकपूर्व जामीन मंजूर

0
1

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांना काल उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. वेलिंगकर हे तपासकामात सहकार्य करीत असल्याने त्यांना अटक करण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्याविषयी अनुद्गार काढल्याने त्यांच्याविरूद्ध डिचोली पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली होती. तसेच ख्रिस्ती धर्मीयांनी 5 ऑक्टोबर रोजी मडगाव येथे मोर्चा आणून संपूर्ण दिवसभर राष्ट्रीय महामार्ग अडवून वाहतूक बंद पाडली होती. या जमावाने वेलिंगकर यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर वेलिंगकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज पणजी सत्र न्यायालयाने फेटाळला होता. तद्नंतर वेलिंगकर यांनी आपणाला अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने निवाडा राखून ठेवला होता. काल न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

दरम्यान, यासंबंधीचे तपासकाम चालू असून त्यासाठी सहकार्य करावे, असा आदेश न्यायालयाने वेलिंगकर यांना दिला आहे.