कमी वीज वापरकर्त्या ग्राहकांना मिळणार मोफत सौर ऊर्जा पॅनल

0
2

>> योजना जाहीर; वीजमंत्र्यांची माहिती

कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी राज्य सरकारने मोफत सौर ऊर्जा पॅनल देण्याची योजना जाहीर केली आहे. राज्यात 400 युनिटपेक्षा कमी विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांनी मोफत सौर ऊर्जा पॅनलसाठी अर्ज करावा, असे आवाहन काल वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. वेळ्ळी येथे कमी दाबाच्या वीजवाहिनीची धर्मापूर पंचायतीत पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते.

लोकांनी आता सौर ऊर्जा वापरण्यासाठी पुढे यायला हवे. सौर ऊर्जेसाठी लोकांना पॅनल उपलब्ध करून देण्यात येतील. पंचायती आणि स्थानिकांनी आपल्या परिसरात रस्त्याच्या कडेला सोलर फार्म उभारण्यासाठी वापरात नसलेली जमीन वापरावी. अशा प्रयोगांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा निर्माण करण्यास मदत होणार असल्याचे ढवळीकर म्हणाले.

सरकारी आस्थापनांच्या छतांवर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार असून, त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक पंचायतींनीही सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यासाठी वीज खात्याशी संपर्क साधला आहे. लोकांनी आता सौर ऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जेचा पर्याय निवडण्याची गरज असल्याचे ढवळीकर यांनी यावेळी सांगितले.