सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत सरकारचे अपयश उघड : युरी

0
6

राज्यातील भाजप सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याबाबतीत पूर्णपणे अपयश ठरले असल्याचा आरोप काल विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी केला.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात दुचाकी गाड्यांचा वाहतुकीसाठी वापर करावा लागत असल्याचे आलेमांव यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी कदंब महामंडळाच्या वर्धापनदिन कार्यक्रमातून बोलताना लोकांनी दुचाकी वाहनांवरून प्रवास करणे कमी करून सार्वजनिक बससेवेचा वाहतुकीसाठी जास्तीत जास्त वापर करावा व वाढत्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले होते. त्यासंबंधी बोलताना आलेमांव यांनी वरील प्रतिक्रिया दिली. कदंब महामंडळाची ‘म्हजी बस’ योजना फसल्याचाही आरोप आलेमांव यांनी यावेळी बोलताना
केला.

राज्यभरातील मार्गांवर धावण्यासाठी कदंब महामंडळाकडे पुरेशा बसेस नसल्याचे आलेमांव म्हणाले. सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचा आरोपही आलेमांव यानी काल केला. कदंब महामंडळाच्या ताफ्यात जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बसेस आणून कदंब महामंडळाला उर्जितावस्था प्राप्त करुन देणे शक्य असताना गोवा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही आलेमांव यानी केल
आहे.

राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झालेली असून राज्यातील रस्ते हे दुचाकींसाठी सुरक्षित नाहीत. रस्त्यांवर पडलेले शेकडो खड्डे बुजवण्याची गरज असल्याचे सांगून सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आलेमांव यांनी केला आहे. राज्यात रात्री 9 नंतर बससेवा नसते. बसेस नसताना लोकांनी प्रवास कसा करावा, असा प्रश्नही आलेमांव यांनी केला.