दसरा सण मोठा…

0
7
  • रमेश सावईकर

आश्विन शुद्ध दशमीला ‘विजयादशमी’ किंवा ‘दसरा’ म्हणतात. दसरा सण म्हणजे विजयाचा उत्सव, विजयोत्सव आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर भारत व पूर्व भारतातील राज्ये यांच्यासह महाराष्ट्र व गोवा राज्यांत दसरा सण आनंद, उत्साह, उमेद नि भक्तिभावाने साजरा करतात. म्हणून ‘दसरा सण मोठा, आनंदा नाही तोटा’ हे वर्णन यथार्थ आहे.

‘दसरा सण मोठा, आनंदा नाही तोटा’ असे म्हटले जाते. आश्विन शुद्ध दशमीला ‘विजयादशमी’ किंवा ‘दसरा’ म्हणतात. हा विजय साजरा करण्याचा दिवस. ‘नवरात्री’ची सांगता विजयादशमीने होते.
दुर्गादेवी किंवा शक्तिदेवीने नऊ दिवस असुरांबरोबर घनघोर युद्ध करून असुरांचा राजा महिषासुर याला व चांड-मुंड, रक्तबीज, शुंभ-निशुंभ या असुरांना ठार मारले. दुर्गादेवीचा हा विजय ‘विजयादशमी’ म्हणून भारतातील अनेक राज्यांत मोठ्या उत्साहात अन्‌‍ थाटात साजरा केला जातो. दुर्गादेवीने म्हैसूरजवळ महिषासुराचा वध केला असे मानले जाते. म्हणून म्हैसूर येथील लोक महिषासुराच्या भव्य प्रतिमा बनवून त्याचे दहन करतात व दुर्गादेवीची मिरवणूक काढतात. म्हैसूर महाल रोशणाई करून सजविला जातो. ‘म्हैसूर’ (कर्नाटक) येथील दसरा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.

या दिवशी प्रभू राम लंकाधीश रावणाचा वध करून सीता व लक्ष्मणासह अयोध्येला परत येतात, म्हणून त्यांच्या विजयाचा हा दिवस लोक साजरा करतात.
‘दसरा’ हा हिंदू पंचांगानुसार साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक आहे. बाकीचे अडीच मुहूर्त चैत्र पाडवा (एक दिवस), अक्षय तृतीया (एक दिवस) व दिवाळी पाडवा (अर्धा दिवस) हे आहेत. त्यामुळे दसरा हा शुभमुहूर्ताचा दिवस होय. दशमीच्या दिवशी आकाशात तारका दिसू लागताच विजय नावाचा मुहूर्त असतो व त्यावेळी जे काम हाती घ्यावे त्यात यश मिळते असे पुराणात सांगितले आहे. या दिवशी शमी किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करतात. शमी झाडाच्या भूमीजवळ अपराजिता देवीची मूर्ती रेखाटून तिचीही पूजा करतात.

रावणाचा वध करण्यासाठी रामाने शमीचे पूजन करून प्रस्थान केले. अर्जुनाने वनवास संपवून याच दिवशी शमीचे पूजन केले व त्या झाडात लपवून ठेवलेली शस्त्रे पुन्हा हातात घेतली.

हा विजयाचा दिवस असल्याने राजाने आपल्या घोड्यांना सुशोभित अलंकार घालावेत, ‘निराजन’ नावाचा विधी करावा, शस्त्रास्त्रांचे पूजन करावे व विजयोत्सवासाठी प्रस्थान करावे, असे शास्त्रात सांगितले आहे.

महाराष्ट्र व गोवा राज्यांत ‘सोने लुटणे’ हा कार्यक्रमाचा एक प्रकार आहे. परस्परांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देणे या प्रकारास ‘सोने लुटणे’ असे म्हणतात. याचा संबंध स्कंदपुराणातील एका कथेशी निगडीत आहे. कौत्सास चौदा कोटी सुवर्णमुद्रा देण्यासाठी रघुराजाने कुबेरावर स्वारी केली. त्यावेळी भयग्रस्त होऊन कुबेराने शमीच्या झाडावर सुवर्णमुद्रांची वृष्टी केली. रघुराजाने कौत्सास चौदा कोटी सुवर्णमुद्रा देऊन बाकीचे सोने जनतेला वाटले. शमीच्या झाडावर वृष्टी झालेले ‘सोने’ लुटले गेले. शमीच्या झाडाचे पूजन केले असता संपत्ती-संपन्नता प्राप्त होते अशी समजूत व श्रद्धा त्यावेळेपासून हिंदू समाजामध्ये वृद्धिंगत झाली. तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी ‘सोने लुटणे’ (परस्परांना आपट्याची पाने देणे) हा प्रकार रूढ झाला.

भारतात सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. उत्तर भारतात या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. कुलू खोऱ्यातील लोक या दिवशी ‘रघुनाथ’ या देवतेचा उत्सव साजरा करतात. रघुनाथाची रथयात्रा, लोकनृत्य आदी विधी करतात. महाराष्ट्रात ‘सीमोल्लंघन’ करतात. ऐतिहासिक काळात मराठा सरदार या दिवशी नव्या मोहिमेवर निघत. म्हैसूरचा ‘दसरा’ भारतात प्रसिद्ध आहे. राजस्थानात या दिवशी रजपूत राजे आपल्या गुरूच्या दर्शनास जातात आणि तिथे शमीचे पूजन करतात. ठाकूर स्त्रिया या दिवशी दसरा-नृत्य करतात. राजस्थानात शमीच्या पूजनास फार महत्त्व दिले जाते.
हा दिवस शुभमुहूर्ताचा असल्याने या दिवशी हिशेबाच्या वह्या, जुन्या पोथ्या, यंत्रे, शस्त्रे वगैरे वस्तूंचे पूजन करण्याची प्रथा आहे. शेतकरीवर्गही हा उत्सव थाटात साजरा करतात. पावसाळा संपून धान्य घरात आल्याने गोड पदार्थांसह भोजन करून आनंदोत्सव साजरा करतात. गोव्यात मंदिरांतून ‘नवरात्रा’ची सांगता झाल्यावर दुर्गादेवीची पालखी मिरवणूक काढण्यात येते. शेतकरीवर्गातर्फे नवे धान्य तयार झाल्याने ‘नवे’ उत्सव करतात. नव-भाताची कणसे घराच्या प्रवेशद्वारावर बांधतात. बागायतदार माड-पोफळीच्या झाडाची पूजा करून महानैवेद्य अर्पण करतात.

दसऱ्यानिमित्त घरांची साफसफाई, रंगरंगोटी, आकर्षक रोशणाई, झेंडूच्या फुलांच्या माळांची आरास, वाहनांना फुलांच्या माळा घालून दसरा सण उत्साहात साजरा करतात. महिला विजया दशमीला उपवासाचे व्रत करतात. कुलदेवतेची षोडशोपचार पूजा, आरती, प्रार्थना, महानैवेद्य समर्पण आदी विधी करतात. काही युवा संस्थांमार्फत दुर्गादेवीची वाजत-गाजत मिरवणूक काढून नंतर मूर्तीचे विधिवत पवित्र पाण्यात विसर्जन केले जाते. गोव्यातील पेडण्याचा दसरा ‘पेडणेची पुनव’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे पैंगीण- काणकोण, आमोणा- साखळी येथील दसरोत्सव वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
पेडण्याचा दसरा हा आश्विन शुद्ध पौर्णिमेपर्यंत चालतो. देवीची ‘तरंगे’ ढोल-ताशे या वाद्यांच्या तालावर मंदिरासमोर नाचविली जातात. ‘घुमटवादन’ हे ‘पेडणे पुनव’ सणाचे वैशिष्ट्य आहे. पेडण्याच्या श्रीभगवती देवीच्या या उत्सवाची आश्विन शुद्ध पौर्णिमेला सांगता होते.
पैंगीण- काणकोण येथील दसरोत्सव प्रसिद्ध आहे. तरंगे नाचविणे याला ‘छत्र्या’ नाचवणेही म्हणतात. या तरंगांना मोराची पिसे बांधली जातात. तरंगा किंवा छत्र्या ढोल-ताशे वाद्यांच्या तालावर गावातून मिरवणूक काढून नाचविली जातात. तरंगांच्या मार्गात भक्तगण फुलांच्या पायघड्या घालून त्यांचे स्वागत करतात. गावात फिरून झाल्यावर तरंगे परत मंदिरात नेऊन ठेवली जातात.

आमोणे-साखळी येथील दसरोत्सवही प्रसिद्ध आहे. फुलांनी सुशोभित केलेली तरंगे नाचविण्याचा मान पुजारी, गावस, सिनारी, च्यारी यांना दिला जातो. तरंगे नाचवत गावातील शमीच्या झाडाजवळ नेण्यात येतात. तिथे शमीचे यथासांग पूजन झाल्यावर ‘तरंगे’ नाचवत परत मंदिरात आणून ठेवली जातात.
अनेक मंदिरांची सार्वजनिक शमीच्या झाडाचे पूजन करण्याची प्रथा गोव्यात आहे. ‘नवरात्रा’ची सांगता होऊन दुर्गादेवीची मिरवणूक काढणे, शमीच्या झाडाचे पूजन, महिषासुर व रावणाच्या प्रतिमेचे दहन आदी धार्मिक व सामाजिक विधिप्रकार म्हणजे वाइटावर चांगल्याचा, असत्यावर सत्याचा विजय याचे प्रतीक आहे. म्हणून दसरा सण म्हणजे विजयाचा उत्सव, विजयोत्सव आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर भारत व पूर्व भारतातील राज्ये यांच्यासह महाराष्ट्र व गोवा राज्यांत दसरा सण आनंद, उत्साह, उमेद नि भक्तिभावाने साजरा करतात. म्हणून ‘दसरा सण मोठा, आनंदा नाही तोटा’ हे वर्णन यथार्थ आहे.