आपल्यातला कलाकार

0
13
  • संघवी उल्हास नाईक, फोंडा

असे म्हटले जाते की ‘कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर.’ जगभरात कितीतरी अद्भुत व उत्तम दर्जाचे कलाकार आहेत, जे आपल्या कलेसाठी व त्यांनी मिळविलेल्या प्रावीण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण एखादा कलाकार कसा आकारला? एका साध्याभोळ्या माणसाच्या शरीरात अविश्वसनीय कलेचा संचार कसा झाला? एखाद्या कलाकाराला आपल्यात असलेल्या कलेचा शोध कसा लागला? आपल्या कलेपर्यंत केव्हा व कशामुळे पोहोचला? असे नाना प्रकारचे प्रश्न कधी तुमच्या मनात आलेत का?

माणसाला या जगाच्या जगण्याच्या पद्धती जेव्हा समजत नाहीत तेव्हा आपल्या दडलेल्या कलेचा शोध घेऊन, कलेला एक नवा आकार देऊन, त्याच कलेच्या माध्यमाने तो आपली एक दुनिया तयार करतो. आणि या भौतिकवादी जगाच्या ताब्यात न फसण्याकरिता आपल्या कलेच्या दुनियेत स्वतःला नव्याने घडवतो. वस्तुतः कलेचा दुःखातून किंवा सहन न होणाऱ्या मनस्वी वेदनेतून जन्म होतो. कदाचित आनंदानेही होऊ शकतो. पण बहुतेक वेळा जे दुःख व ज्या भावना बोलून व्यक्त करता येत नाहीत त्या कलेच्या माध्यमातून व्यक्त केल्या जातात. कलाकार होणे हा काही कुठल्याही प्रकारचा ‘जॉब’ नव्हे. एखादा डॉक्टर, शिक्षक, सायंटिस्ट, पोलीस, चहावाला, न्हावी, मच्छीमार कोणीही कलाकार असू शकतो. प्रत्येक माणसाच्या अंगी कुठल्या न कुठल्या प्रकारची कला ही जन्मापासून रुजलेली असते. काहींना त्याची जाणीव अगदी नाजूक वयात होते, तर काहींना म्हातारपणात. आणि किंचित असेही कितीजण असतात ज्यांना आपल्या कलेची जाणीवच होत नाही.

संगीतकार असो, लेखक असो, नर्तक, नाट्यकलाकार, चित्रकार असो किंवा इतर कुठलाही कलाकार असो; दर एक कलाकाराचा दृष्टिकोन विलक्षण व खोलवर असतो. उदा. सामान्य माणसाला गुलाबाचे फूल फक्त फूल दिसणार. पण कलाकार त्या गुलाबाच्या प्रत्येक पाकळीत दडलेलं काव्य व सर्जनशीलतेच्या शोधात बारकाईने निरीक्षण करणार आणि त्या निरीक्षणाने साध्या गुलाबाच्या फुलालासुद्धा असामान्य रीतीने आपल्या कलेत प्रदर्शित करणार. एवढी श्रेष्ठ महानता एका कलाकाराच्या दृष्टिकोनाची असते.

असेही म्हटलेले आहे की ‘लाईफ इज कॅनव्हास, यू आर द आर्टिस्ट.’ अर्थात, आयुष्य हा एक कॅनव्हास आहे, आम्ही माणसं कलाकार आहात व आपले अनुभव ते रंग आहेत. प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा हा कॅनव्हास निरनिराळ्या रंगांनी म्हणजेच अनेक अनुभवांनी हवा तसा रंगवावा. तुमच्यातही असाच एक कलाकार आहे. तो बहुतेक भरकटलेल्या आयुष्यामुळे खचून गेला असेल, थकला असेल, लपला असेल, पण तुम्ही त्याला स्वतःच स्वतःमध्ये शोधा. कारण पैशांसाठी काम करणे ही तातडीची गरज आहे, पण मन:शांतीसाठी निस्वार्थ काहीतरी करणे यालाच म्हणतात कला. गोंधळलेल्या व व्यस्त जीवनात अशा या सर्व गोष्टींसाठी वेळ मिळत नाही अशी सबब देण्याऐवजी वेळातही वेळ काढा. कारण कलेला दिलेला वेळ कधीही वाया जात नाही. कलेला दिलेला वेळ म्हणजे स्वतःशी उत्तम प्रकारे ‘कनेक्ट’ व्हायचा सर्वात सोपा व सुंदर मार्ग आहे. हल्लीच ‘मेडिकल फिल्ड’मध्ये प्रवेश करून वेळाचे महत्त्व समजले; त्याचबरोबर आयुष्याचेही. सर्वांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरलाही स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागते. म्हणून मी तीच स्वतःची काळजी घेण्याकरिता रात्रीकडून थोडासा वेळ चोरून स्वतःसाठी घ्यायचे ठरवले. मी त्या चोरलेल्या वेळेत स्वतःचे घाव कलेच्या माध्यमातून भरावयाचे ठरविले. तर मग शोधा तुमच्यातला कलाकार. त्याच्याकडे आहे तुमच्या असाध्य आजारांचे औषध. जे बोलून, सांगून व्यक्त करता येत नाही, तेच कलेनं व्यक्त करा. कारण वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जिवंत ठेवा!