जीपीएस बसवण्यास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

0
8

सार्वजनिक वाहनांना ट्रॅकिंग उपकरण सक्तीचे

राज्य सरकारच्या वाहतूक खात्याने सार्वजनिक सेवा वाहनांना ट्रॅकिंग उपकरण आणि एक किंवा अधिक आपत्कालीन बटणे बसवण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे. तसेच, जर वाहनांमध्ये अशी उपकरणे असतील आणि ती काम करत नसतील तर त्यांची 30 नोव्हेंबरपर्यंत दुरुस्ती करावी, असे म्हटले आहे.
ट्रॅकिंग उपकरण आणि आपत्कालीन बटण कोणत्याही विक्रेत्याकडून खरेदी केले जाऊ शकते. परंतु उपकरण आणि बटण एआयएस 140 मानकाचे पालन करणारे असले पाहिजे, असे या संदर्भात जारी केलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. यापूर्वी उपकरण आणि बटन ही उपकरणे विशिष्ट विक्रेत्यांकडून खरेदी करण्याची सक्ती होती.

केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सार्वजनिक सेवा देणाऱ्या सर्व वाहनांना ट्रॅकिंग उपकरण आणि आपत्कालीन बटन 1 एप्रिल 2018 पासून सक्तीचे केले आहे. वाहतूक खात्याने केलेल्या विविध पाहणीमध्ये वाहनांमध्ये वाहन ट्रॅकिंग उपकरण आणि आपत्कालीन बटन बसविण्यात न आल्याचे किंवा कार्यरत नसल्याचे आढळून येत आहे. राज्यातील वाहनांच्या मालकांनी वाहनाला ट्रॅकिंग उपकरण किंवा आपत्कालीन बटन बसविण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी मुदत देण्याची विनंती केली होती. वाहतूकदार एआयएस-140 मानक असलेली ट्रॅकिंग उपकरण आणि आपत्कालीन बटन ही दोन्ही उपकरणे मान्यता प्राप्त विक्रेत्याकडून खरेदी करू शकतात. आता, 30 नोव्हेंबरपर्यंत वाहतूकदारांनी आपल्या वाहनांना दोन्ही उपकरणे बसवून घ्यावीत. 30 नोव्हेंबरनंतर सर्व सार्वजनिक सेवा देणाऱ्या वाहनांना दोन्ही उपकरणे सक्तीची केली जाणार आहेत. वाहनाच्या फिटनेस चाचणीच्या वेळी दोन्ही उपकरणांची तपासणी केली जाणार आहे, असे वाहतूक संचालक पी. प्रविमल अभिषेक (आयएएस) यांनी जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे.