>> मर्सिडीझचालक परेश सावर्डेकरसह 7 जणांची नावे; 1158 पानी आरोपपत्रात 121 जणांच्या साक्षी नोंद
गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने बाणस्तारी अपघात प्रकरणी कारचालकासह एकूण 7 जणांविरोधात काल फोंडा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. बाणस्तारी पुलाजवळ 6 ऑगस्ट 2023 रोजी भरधाव मर्सिडीझ कारने समोरून येणाऱ्या कार आणि दुचाकी वाहनांना धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघात तिघांचा बळी गेला होता. या प्रकरणात कारचालक परेश सावर्डेकर याच्यासह अमित पालेकर, गणेश लमाणी, अभिजित शेट्ये, विष्णू तारकर, अत्रेय सावंत आणि प्रज्योत चोडणकर या सात जणांच्याविरोधात 1158 पानांचे आरोपपत्र फोंडा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
या भीषण अपघातात तीन जणांचा बळी गेला होता, तर चार जण गंभीर जखमी झाले होते. तसेच, चार जण किरकोळ जखमी झाले
होते.
पोलिसांनी या अपघात प्रकरणामध्ये 121 जणांच्या साक्षी नोंद केल्या आहेत. चालक परेश सावर्डेकर याच्यावर निष्काळजीपणे मद्याच्या नशेत वाहन चालविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मर्सिडीझ कार फोंडा येथून पणजीच्या दिशेने जात होती. या भीषण अपघातानंतर चालक परेश सावर्डेकर याने जखमींना मदत न करता अपघातस्थळावरून पलायन केले होते. तसेच, त्याने गणेश लामाणी हा अपघाताच्या वेळी कार चालवत असल्याचे पोलिसांना सांगून फसविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तसेच, त्याने अपघात प्रकरणी पोलिसांना चुकीची माहिती दिली आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात
आला आहे.
परेश सावर्डेकर याला कारवाईतून वाचविण्यासाठी पोलिसांना चुकीची माहिती देण्याचे कट कारस्थान तिवरे येथील अत्रेय सावंत यांच्या निवासस्थानी रचण्यात आले. या कट कारस्थानात सावर्डेकर याच्यासह अमित पालेकर, गणेश लमाणी, अभिजित शेट्ये, विष्णू तारकर, अत्रेय सावंत आणि प्रज्योत चोडणकर यांचा
सहभाग होता.