दोघा अमेरिकन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल

0
3

>> व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुव्हकून यांना मायक्रो आरएनए शोधल्याबद्दल मिळाला सन्मान

यंदाच्या नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा सोमवारपासून सुरू झाली आहे. काल वैद्यकशास्त्र क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले. वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुव्हकून यांना जाहीर झाले आहे. ‘मायक्रो आरएनए’च्या शोधाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. नोबेल विजेत्यांची निवड स्वीडनच्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या नोबेल असेंब्लीद्वारे केली जाते.

मायक्रो आरएनएवर केलेल्या या संशोधनांमुळे जनुके मानवी शरीरात कसे कार्य करतात आणि ते मानवी शरीराच्या विविध गोष्टींना कसे निर्माण करतात हे स्पष्ट करण्यात मदत झाली. ॲम्ब्रोस आणि रुव्हकून यांच्या या शोधामुळे जनुके नियमनाचे एक नवीन तत्त्व समोर आले आहे. हे तत्व मानवासह बहुपेशीय जीवांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सिद्ध झाले आहे. आपल्या शरीरातील सर्व पेशींची जनुके सारखीच असली तरी, स्नायू आणि चेतापेशी यांसारख्या विविध प्रकारच्या पेशींची कार्ये वेगवेगळी असतात, असे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

ॲम्ब्रोस आणि रुव्हकून यांच्या मायक्रो आरएनए तंत्रज्ञानाने बनवलेल्या कोरोनाविरोधी लसीमुळे जग कोरोना महामारीतून बाहेर येऊ शकले. वास्तविक, कोरोनादरम्यान पहिल्यांदाच असे घडले जेव्हा मायक्रो आरएनए तंत्रज्ञानावर आधारित लस तयार करण्यात आली. तशा प्रकारची लस पीफायझर, बायोएनटेक आणि मॉर्डना यांनी बनवली होती.

नोबेल पारितोषिक विजेत्यांना 11 मिलियन स्वीडिश क्रोनर म्हणजेच अंदाजे 8.90 कोटी रुपये रोख रक्कम दिली जाईल. नोबेल पारितोषिक 1901 मध्ये सुरू झाल्यापासून 2024 पर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील 229 व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या वेळी वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक कॅटलिन कॅरिको आणि ड्र्‌‍यू वेसमन यांना मिळाले होते.