विद्यार्थिनींच्या मारहाणीत मुलगी गंभीर जखमी; पालक आक्रमक

0
6

न्यायासाठी पालक व नागरिकांचा कुंकळ्ळी पोलीस स्थानकावर मोर्चा; दोघा शिक्षिकांच्या निलंबनाची मागणी

वेरोडा-कुंकळ्ळी येथील एका सरकारी अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक विद्यालयात मुलांच्या भांडणात गंभीर जखमी झालेल्या 9 वर्षीय मुलीला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी काल सायंकाळी पालक व बाळ्ळीतील नागरिकांनी कुंकळ्ळी पोलीस स्थानकावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी कुंकळ्ळी पोलिसांनी त्यांना रोखून धरले. त्यामुळे वातावरण तंग बनले. त्या दिवशी नेमका प्रकार काय घडला याची माहिती जाणून घेण्यासाठी सदर शाळेच्या मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिकेला पोलीस स्थानकात आणावे, या मागणीसाठी ते रात्री उशिरापर्यंत अडून बसले होते. जवळपास 500 हून अधिक लोकांचा जमाव घटनास्थळी जमल्याने दक्षिण गोवा पोलीस व आयआरबी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या सदर मुलीवर बांबोळी येथे गोमेकॉत उपचार चालू आहेत व तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या शुक्रवार दि. 27 रोजी तिसरी इयत्तेत शिकत असलेली सदर 9 वर्षीय मुलगी आणि काही विद्यार्थिनींमध्ये भांडण झाले. त्यात त्या विद्यार्थिनींनी सदर मुलीला मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यात तिच्या मेंदूला मार बसला. जखमी होऊनही शाळा व्यवस्थापन व शिक्षकांनी कोणताच इलाज केला नाही. त्यामुळे तिची प्रकृती गंभीर बनली. जेव्हा तिचे पालक मुलीला आणण्यासाठी शाळेत गेले, तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती व तिच्या तोंडातून फेस येत होता. मुलगी गंभीर जखमी होऊनही शिक्षक व मुख्याध्यापिकेने तिला इस्पितळात दाखल केले नाही, अशी पालकांची तक्रार आहे. पालकांनी तिला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात इस्पितळात दाखल केल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

जखमी मुलीच्या पालकांनी घटनेनंतर त्याच दिवशी कुंकळ्ळी पोलीस स्थानकावर तक्रार नोंदविली होती; पण पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांनी कोणतीच कारवाई न केल्याने पालक व लोक संतापले आणि काल त्यांनी पोलीस स्थानकावर मोर्चा नेला.

सदर शाळेच्या मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिकेला पोलीस स्थानकात आणावे व त्यांच्याकडून त्या दिवशी घडलेला प्रकार लोकांसमोर सांगावा, अशी मागणी मोर्चावेळी करण्यात आली. तसेच पोलीस व शिक्षण खात्यातर्फे चौकशी होईपर्यंत त्यांना तात्पुरतेे निलंबित करण्याची मागणीही केली. ही घटना घडली असताना कुंकळ्ळी पोलिसांनी त्या शिक्षिकेची चौकशी केली नाही. उलट काल दुपारी पालक व लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवल्याने जमाव आणखी संतापला व त्यांनी रस्ता रोखून धरला.
काल पोलीस निरिक्षकांची भेट घेतल्यानंतर कोणतेच ठोस उतर न दिल्याने लोक संतापले व त्यांनी रस्ता रोखला. यानंतर पोलीस अधीक्षक संतोष देसाई हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली; पण जमाव आपल्या मागणीवर ठाम राहिला.

बऱ्याच वेळाने माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर तेथे पोहचले व त्यांनी पालकांची मागणी जाणून घेऊन पोलिसांशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी देखील संपर्क साधला. त्यांनीही पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली; पण लोकांनी मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिकेला पोलीस स्थानकात आणण्याचा हट्ट कायम ठेवला. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी निरीक्षकांना त्या दोघींनाही आणण्यासाठी घरी पाठविले; मात्र त्या घरी सापडू शकल्या नाहीत. रात्री उशिरापर्यंत जमाव घटनास्थळी होता.