इस्रायलचे सूडसत्र

0
2

अमेरिका फ्रान्स आणि काही आखाती देशांनी पुढे आणलेला एकवीस दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळून इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्धची आपली मोहीम आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. एकीकडे गाझामध्ये हमासविरुद्धची मोहीम प्रदीर्घ काळ सुरू ठेवून इस्रायलने सात ऑक्टोबरच्या रानटी हल्ल्याचा वचपा काढला, तर दुसरीकडे आपल्याला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेबनॉनमधील हिजबुल्लाह आणि येमेनमधील हौथी बंडखोरांविरुद्धही इस्रायलने आघाडी उघडली आहे. आजवर हिजबुल्लाहने लेबनॉनच्या दक्षिणेकडील इस्रायलच्या सीमेला भिडून असलेल्या खेडेगावांमध्ये आपली माणसे पेरली. तेथे इस्रायलवर हल्ले चढवण्यासाठी शस्त्रास्त्रांची साठवणूक चालवली. मानवी ढाल वापरून इस्रायलला जेरीस आणायचा प्रयत्न हिज्बुल्लाहचे दहशतवादी सातत्याने करीत आले. परंतु इस्रायल त्यांना पुरून उरलेला दिसतो. काही दिवसांपूर्वीचे पेजर हल्ले आणि वॉकी टॉकी संचांमधील स्फोट याद्वारे इस्रायलने हिज्बुल्लाहचे कंबरडेच मोडले आहे. शिवाय हिज्बुल्लाहचे एकेक नेतृत्व थेट हल्ले चढवून नेस्तनाबूत करण्याचा सपाटाच इस्रायलने लावलेला आहे. त्यात आतापर्यंत इब्राहिम कुसैसी, इब्राहिम अकील, फहद शुक्र, महंमद नासेर, तालिब अब्दुल्ला आणि नुकताच महंमद स्रर ऊर्फ अबू सालेह यांचा काटा काढण्यात आला आहे. वेळ पडली तर थेट लेबनॉनमध्ये आपले पायदळ घुसवायलाही तो देश मागेपुढे पाहणार नाही अशी आज स्थिती आहे. इस्रायलवर हमास, हिज्बुल्लाह किंवा हौथींकडून डागली जाणारी क्षेपणास्रे आपल्या अत्याधुनिक क्षेपणास्रविरोधी यंत्रणेद्वारे हवेतल्या हवेत नष्ट करण्याची जी कमाल इस्रायलने आजवर दाखवलेली आहे तिला खरोखर तोड नाही. ही अत्याधुनिक क्षेपणास्रविरोधी यंत्रणा नसती तर इस्रायलमध्ये काय हाहाकार माजला असता कल्पनाही करवत नाही. पेजरमध्ये आणि वॉकी टॉकींमध्ये घडविण्यात आलेल्या स्फोटांनी तर इस्रायलची मोसाद सूड उगवण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकते ते दाखवून दिले. इलेक्ट्रॉनिक उपकरणे मानवी अवयवांइतकीच अत्यावश्यक बनलेल्या आजच्या काळामध्ये धोका किती मोठा असू शकतो त्याची हादरवून सोडणारी जाणीव जगाला ह्यानिमित्ताने झाली आहे. लेबनॉनमधील हिज्बुल्लाहविरूद्धची मोहीम अशी निर्णायक स्थितीत लढली जात असताना युद्धविरामाचा प्रस्ताव इस्रायलकडून स्वीकारला जाणे शक्य नव्हते. तो स्वीकारला तर हिज्बुल्लाहला आपली विस्कळीत झालेली यंत्रणा पुन्हा सावरण्याची आणि इस्रायलला लक्ष्य करण्याची संधी मिळेल हे तो देश जाणून आहे. शिवाय सात ऑक्टोबर जवळ येतो आहे. हमास, हिज्बुल्लाह किंवा हौथींकडून गेल्या सात ऑक्टोबरचे स्मरण करून देण्यासाठी पुन्हा एखाद्या भीषण हल्ल्याचे नियोजन केले जात असू शकते ह्याचा इस्रायलला अंदाज आहे. त्यामुळेच सध्या अशा प्रकारचे कोणतेही पूर्वनियोजन उद्ध्वस्त करण्यासाठी इस्रायलने आक्रमक पावले उचलली आहेत. इस्रायल व हिज्बुल्लाहमधील या ह्या संघर्षामुळे त्या साऱ्या प्रदेशात प्रचंड अशांतता निर्माण झाली आहे हे खरे आहे. गेल्या आठवड्यातच लेबनॉनमध्ये सातशेच्या वर लोकांचा बळी गेला आहे, तर एक लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. परंतु ह्या विनाशाला मुख्यतः हिज्बुल्लाहची मानवी ढाल करण्याची नीतीच कारणीभूत आहे. आम नागरिकांची ढाल करून त्यांच्या आड स्फोटके आणि शस्त्रास्त्रांसह आपले दहशतवादी पेरत आलेल्या हिज्बुल्लाहला त्या नागरिकांच्या प्राणांची फिकीर नाही आणि सूडाने पेटलेला इस्रायलही त्या नागरिकांची चिंता करताना दिसत नाही. परिणामी लेबनॉनमधील आम नागरिकही ह्या संघर्षात भरडून निघाले आहेत. आपण केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करीत आहोत आणि सारे आंतरराष्ट्रीय कायदेकानून पाळत आहोत असे इस्रायल सांगत आहे, परंतु एकादे क्षेपणास्र जेव्हा डागले जाते, तेव्हा ते दहशतवादी आणि निरपराध यात फरक करीत नाही हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्राणहानी होत राहिली आहे. ह्या संघर्षाला अंत नाही अशीच परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. मागे हटण्याची कोणाचीच तयारी दिसत नाही. ज्या तऱ्हेने इस्रायलला शह देण्यासाठी आणि हमासच्या समर्थनार्थ लेबनॉनपासून येमेनपर्यंत नव्या आघाड्या उघडण्यात आल्या, ते पाहता इस्रायलला नामशेष करण्याचे त्यामागील इरादे स्पष्ट दिसून आले. त्यामुळे आपल्या अस्तित्वाची लढाई लढणारा इस्रायल प्राणपणाने व कोणतीही दयामाया न दाखवता प्रत्युत्तर देताना दिसतो आहे. ज्या तऱ्हेने हमासने संगीतसोहळ्यावर हल्ला चढवून आणि इस्रायली स्त्रियांना पळवून नेऊन ओलीस ठेवून आपल्या रानटीपणाचे दर्शन घडवले, त्यातून पेटलेला हा वणवा आणि सूडसत्र मानवतेचीच राखरांगोळी करीत राहिला आहे.