1 ऑक्टोबरपासून पाळीव श्वानांची नसबंदी अन्‌‍ चिप बसवणार

0
2

>> ‘मिशन रेबिज’चे प्रमुख डॉ. मुरुगन यांची माहिती; चिप मोफत बसवणार; राज्यातील मोकाट श्वानांना रेबिजविरोधी लसीकरण पूर्ण

येत्या 1 ऑक्टोबरपासून राज्यातील पाळीव श्वानांच्या नसबंदीचे, तसेच त्यांना चिप बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत कोणतेही शुल्क न आकारता श्वानांच्या अंगावर मोफत एक छोटीशी चिप बसवण्यात येणार आहे. त्या चिपमुळे श्वानाविषयीची सर्व माहिती मिळू शकेल. तसेच तो हरवल्यास त्याचा शोध घेणेही सोपे होणार असल्याचे ‘मिशन रेबिज’चे प्रमुख डॉ. मुरुगन यांनी काल पणजीतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

श्वानांना चिप बसवण्याचे काम बाणावली मतदारसंघातून सुरू होणार असल्याची माहिती देखील डॉ. मुरुगन यांनी यावेळी दिली. कालांतराने सर्वच श्वानांना चिप बसवणे हे बंधनकारक होणार असून, त्यावेळी मात्र चिप विकत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त श्वानमालकांनी आताच मोफत मिळणारी चिप आपल्या श्वानावर बसवून घ्यावी, असे आवाहन डॉ. मुरुगन यांनी केले.

गोव्यात सुमारे दीड लाख एवढे मोकाट श्वान असल्याची माहिती यावेळी डॉ. मुरुगन यांनी दिली. त्यातील बहुतेक म्हणजेच जवळपास सर्व श्वानांना रेबिजविरोधी लस यापूर्वीच टोचण्यात आलेली असल्याने आता राज्यातून रेबिजचे निर्मूलन झाले आहे, असा दावा त्यांनी केला. 2018 सालापासून रेबिजमुळे राज्यात कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, शेजारच्या राज्यांतून येणाऱ्या मोकाट श्वानांमुळे राज्यात पुन्हा एकदा रेबिजचा शिरकाव होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील मोकाट श्वानांच्या नसबंदीचे काम चालू असून, आम आदमी पक्षाचे नेते व आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे गेल्या जुलै व ऑगस्ट महिन्यात कोलवा, बाणावली ते केळशीपर्यंतच्या किनारी भागातील श्वानांच्या नसबंदीचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती डॉ. मुरुगन यांनी दिली. या पत्रकार परिषदेला आमदार व्हेन्झी व्हिएगस उपस्थित होते.