जम्मू-काश्मीरात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान

0
5

>> 26 जागांसाठी 239 उमेदवार रिंगणात;

>> त्यात फक्त 6 महिला उमेदवारांचा समावेश

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवार दि. 25 सप्टेंबर रोजी 6 जिल्ह्यांतील 26 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. त्यामध्ये 25.78 लाख मतदार मतदान करू शकतील.

दुसऱ्या टप्प्यातील 26 जागांपैकी 15 जागा मध्य काश्मीरमधील आणि 11 जागा जम्मूमधील आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यात 239 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये 233 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे.

माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे गांदरबल आणि बिरवाहमधून निवडणूक लढवत आहेत. दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक 8 जागा श्रीनगरमध्ये आणि सर्वात कमी 2 जागा गांदरबल जिल्ह्यात आहेत. याशिवाय बडगाम आणि राजौरीच्या 5-5 जागांवर आणि रियासी आणि पुंछच्या 3-3 जागांवर मतदान होणार आहे. श्रीनगर विभागात गंदरबल, श्रीनगर, बडगाम आणि जम्मू विभागात रियासी, राजौरी आणि पूंछ यांचा समावेश आहे. श्रीनगरच्या हब्बाकडल जागेसाठी सर्वाधिक 16 उमेदवार रिंगणात आहेत, तर राजौरीतील बुधलमध्ये 4 उमेदवारांमध्ये लढत आहे.

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) या टप्प्यात सर्व 26 जागांवर निवडणूक लढवत आहे. युती करून निवडणूक लढवत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सने 20 जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर काँग्रेसने 6 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपकडे 17 उमेदवार असून 98 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. दुसऱ्या टप्प्यात श्रीनगर जिल्ह्यात 93 उमेदवार रिंगणात आहेत. बडगाममध्ये 46, राजौरीमध्ये 34, पूंछमध्ये 25, गांदरबलमध्ये 21 आणि रियासीमध्ये 20 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात 7 जिल्ह्यांतील 24 विधानसभा जागांसाठी 61.38 टक्के मतदान झाले होते.