दाबोळीवरील विमाने वळवण्यासाठी जीएमआरकडून दबावतंत्र

0
2

>> वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांचा आरोप; सरकारला दोन्ही विमानतळ हवे

दाबोळी विमानतळावरील उतरणारी विमाने मोपातील मनोहर विमानतळावर वळवण्यासाठी जीएमआर कंपनी आपले वजन वापरत आहे. जीएमआर कंपनी विमान कंपन्यांवर दबाव टाकत आहे; मात्र त्यांना त्यात यश येणार नाही. राज्य सरकारला दोन्ही विमानतळ चालू राहिलेले हवे असून, सरकार दाबोळी विमानतळ बंद पडू देणार नसल्याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल स्पष्ट केले.

दाबोळी विमानतळाबाबत कुणीही घाबरण्याची गरज नसून, यंदाच्या पर्यटन हंगामात कित्येक चार्टर विमाने या विमानतळावर उतरणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमानांचीही मोठ्या संख्येने या विमानतळावर ये-जा चालूच राहणार असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

दाबोळी विमानतळावर मोठ्या संख्येने देशी-विदेशी विमाने यावीत यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करावे अशी मागणी आम्ही वेळोवेळी करीत आलेलो असून, केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडूनही त्याबाबत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही परिस्थितीत दाबोळी विमानतळ बंद होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबरच आपणही वेळोवेळी केंद्राशी बोलणी केली असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट कले.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मोपा तसेच दाबोळी या दोन्ही विमानतळांचा अभ्यास करण्यासाठी तांत्रिक समिती पाठवण्याचीही तयारी दाखवली असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. हल्लीच्या काळात ‘इंडिगो’ कंपनीसह अन्य काही कंपन्यांनीही दाबोळीवरून आपली उड्डाणे वाढवली असल्याची माहितीही गुदिन्हो
यांनी दिली.