राज्य सहकारी बँकेतर्फे लवकरच यूपीआय सेवा

0
7

>> अध्यक्ष फळदेसाई यांची माहिती; बँक तोट्यातून पुन्हा नफ्यात

गोवा राज्य सहकारी बँकेतर्फे यूपीआय ही डिजिटल बँकिंग सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी बँकेला 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत काल दिली.
या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर, संचालक श्रीकांत नाईक, प्रभाकर गावकर, उमेश शिरोडकर, व्यवस्थापकीय संचालक अनंत चोडणकर यांची उपस्थिती होती.

राज्य सहकारी बँकेचा कारभार आता रुळावर आला असून, बँक तोट्यातून पुन्हा नफ्यात आली आहे. सहकारी बँक वर्ष 2012 अखेर 68.36 कोटी रुपये तोट्यात होती. मार्च 2024 अखेर बँकेला 4.28 कोटी रुपयांचा नफा झाला. सध्या बँकेची आर्थिक सुधारणा झाल्याने 14 वर्षांनंतर प्रथमच बँकेने यंदा 3 टक्के लाभांश जाहीर केला आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.

आज षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त खास कार्यक्रम
राज्य सहकारी बँकेची स्थापना 2 फेब्रुवारी 1964 रोजी झाली होती. यंदा बँकेने 60 वर्षे पूर्ण केली आहेत. बँकेच्या 60 व्या वर्षपूर्तीनिमित्त शुक्रवार दि. 20 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 3 वाजता पाटो-पणजी येथील मुख्यालयात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.