जम्मू-काश्मीरमध्ये आज मतदान

0
4

>> पहिल्या टप्प्यात 7 जिल्ह्यांतील 24 जागांसाठी 219 उमेदवार रिंगणात

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बुधवार दि. 18 सप्टेंबर रोजी 7 जिल्ह्यांतील 24 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. या जागांसाठी 219 उमेदवार रिंगणात असून, 23.27 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

पहिल्या टप्प्यातील 24 जागांपैकी 8 जागा जम्मू विभागात आणि 16 जागा काश्मीर खोऱ्यात आहेत. सर्वाधिक 7 जागा अनंतनाग जिल्ह्यात आहेत.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 219 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये 9 महिला आणि 92 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. 110 उमेदवार कोट्यधीश आहेत, तर 36 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.

मुफ्ती कुटुंबाचा बालेकिल्ला असलेली बिजबेहारा जागाही याच टप्प्यात आहे. येथे पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा प्रथमच निवडणूक लढवत आहे. मेहबूबा आणि त्यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद हे मुख्यमंत्री राहिले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील 90 विधानसभा जागांवर 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. 2014 च्या निवडणुकीत पीडीपीला सर्वाधिक 28 आणि भाजपला 25 जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्षांनी मिळून सरकार स्थापन केले होते. दरम्यानच्या काळात भाजप-पीडीपी युतीचे सरकार कोसळले. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. या दरम्यान केंद्र सरकारने संसदेत खास विधेयक सादर करत 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवले. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर येथे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत.

जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांपैकी 74 सर्वसाधारण, 7 अनुसूचित जाती आणि 9 अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. विशेष राज्य असल्यामुळे कलम 370 हटवण्यापूर्वी जम्मू-काश्मीर सरकारचा कार्यकाळ 6 वर्षांचा होता, मात्र आता तो 5 वर्षांचाच असेल.