नव्या मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयुक्तांचा आज शपथविधी

0
11

राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी अरविंद कुमार एच. नायर आणि राज्य माहिती आयुक्तपदी आत्माराम रामकृष्ण बर्वे यांच्या नियुक्तीचा आदेश काल जारी करण्यात आला. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे मंगळवार दि. 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता राजभवनातील जुन्या दरबार सभागृहात त्यांना पदाची शपथ देणार आहेत.

राज्यातील मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त ही दोन्ही पदे गेल्या पाच महिन्यांपासून रिक्त आहेत. नवीन मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्तांच्या तीन वर्षांच्या नियुक्तीचा आदेश माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर यांनी जारी केला आहे.

राज्य माहिती आयुक्तपदी आत्माराम बर्वे यांच्या नियुक्तीला काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला होता. बर्वे हे मुख्यमंत्र्याचे ओएसडी म्हणून काम करीत आहेत. तसेच, भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, असा आरोप काँग्रेसने केला होता. कॉँग्रेसने राज्यपालांना एक निवेदन सादर करून राज्य माहिती आयुक्तपदी त्यांच्या नावाला मान्यता देऊ नये, अशी मागणी केली होती. तथापि, मुख्यमंत्र्यांनी राज्य माहिती आयुक्तपदी बर्वे यांची नियुक्ती कायदा आणि नियमाला अनुसरून असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
राज्य माहिती आयुक्तपदी आत्माराम बर्वे यांची नियुक्ती करून भाजपने संविधानिक संस्था आणि लोकशाही नष्ट करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. नागरिकांनी माहिती अधिकाराखाली माहिती मिळण्यापासून रोखण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.