>> हिंसक घटनेत 20 जण जखमी
>> राज्यपाल, डीजीपींच्या राजीनाम्याची मागणी
मणिपूरमध्ये राज्यपाल आणि डीजीपी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या निदर्शनाला सोमवारी हिंसक वळण लागले. शेकडो विद्यार्थ्यांनी राजभवनाच्या मुख्य दरवाजावर दगडफेक केली. यावेळी उपस्थित सुरक्षा कर्मचारी जीव वाचवण्यासाठी तेथून पळताना दिसले. या हल्ल्यात 20 जण जखमी झाले आहेत.
राज्यातील वाढत्या हिंसक घटना आणि ढासळणारी कायदा व सुव्यवस्था यामुळे विद्यार्थी रविवारी 8 सप्टेंबरपासून रस्त्यावर उतरले आहेत. रविवारी किशमपत येथील तिद्दीम रोडवर 3 किलोमीटर कूच केल्यानंतर आंदोलक राजभवन आणि सीएम हाऊसवर पोहोचले.
पोलीस आणि सुरक्षा दलांनी बॅरिकेड्स लावून त्यांना रोखले. अश्रुधुराच्या अनेक नळकांड्याही डागण्यात आल्या. आंदोलक रस्त्यावर बसून घोषणाबाजी करू लागले. विद्यार्थ्यांनी, सरकार आणि पोलीस ड्रोन हल्ले रोखण्यात अपयशी ठरले असून राज्यपालांव्यतिरिक्त, आंदोलक डीजीपी, सुरक्षा सल्लागार आणि 50 आमदारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मणिपूरमध्ये मे 2023 पासून कुकी आणि मेईतेई समुदायांमधील हिंसाचार सुरू आहे. गेल्या 7 दिवसांत हा हिंसाचार वाढला आहे. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 हून अधिक जखमी झाले आहेत. अलीकडे मणिपूरमध्येही ड्रोन हल्ले झाले आहेत. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवारपासून सुरू झालल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन काल सोमवारीही सुरू होते. यावेळी सकाळी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापटही झाली.
1 सप्टेंबरपासून ड्रोन हल्ले
1 सप्टेंबर रोजी राज्यात पहिल्यांदाच ड्रोन हल्ला झाला. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कोत्रुक गावात, अतिरेक्यांनी डोंगराळ भागातून गोळीबार केला आणि कोत्रुक आणि कडंगबंद खोऱ्यातील खालच्या भागात ड्रोन हल्ले केले. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले. त्यांतर दुसरा ड्रोन हल्ल 3 सप्टेंबर रोजी अतिरेक्यांनी इंफाळ जिल्ह्यातील सेजम चिरांग गावात केला. यामध्ये एका महिलेसह तीन जण जखमी झाले. अतिरेक्यांनी निवासी भागात ड्रोनमधून तीन स्फोटके टाकली, ज्याचा स्फोट घरांच्या आत झाला आणि छप्पर तुटले. अतिरेक्यांनी टेकडीवरूनही गोळीबार केला. त्यानंतर मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांगमध्ये माजी मुख्यमंत्री मारेम्बम कोईरेंग यांच्या घरावर 6 सप्टेंबर रोजी हल्ला झाला. कुकी अतिरेक्यांनी रॉकेट बॉम्ब फेकले. या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले. 7 सप्टेंबर रोजी जिरीबाममध्ये दोन हल्ले झाले. या घटनेत 5 जण ठार झाले. यातील पहिली घटना जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 7 किमी अंतरावर घडली. येथे संशयित पहाडी अतिरेक्यांनी एका घरात घुसून एका वृद्ध व्यक्तीची झोपेत असताना गोळ्या झाडल्या. तो घरात एकटाच राहत होता. दुसऱ्या घटनेत कुकी आणि मेईतेई लोकांमध्ये गोळीबार झाला. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला.
मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राज्यपाल लक्ष्मण आचार्य यांना 8 कलमी मागण्यांची यादी सादर केली आहे. यामध्ये राज्य सरकारला राज्यघटनेनुसार अधिकार आणि जबाबदाऱ्या देण्याचे म्हटले आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी कुकी अतिरेक्यांसोबत केलेला सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स (डेज) करार रद्द करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून सुरक्षा दले कुकी अतिरेक्यांवर पूर्ण ताकदीने कारवाई करू शकतील. याशिवाय नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (छठउ) ची प्रक्रिया सुरू करून सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढण्याचीही चर्चा झाली आहे.
सरकारचे मोठे पाऊल
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मणिपूरचे आयजी (गुप्तचर) के. कबिब यांनी शनिवारी 7 सप्टेंबर रोजी, ड्रोनविरोधी मजबूत यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. पोलिसांसाठी नवीन शस्त्रे खरेदी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मैदानात आणण्यात आले आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे हवाई गस्त सुरू आहे. संवेदनशील भागात सुरक्षा कर्मचारी तैनात केले असल्याची माहिती दिली.
आतापर्यंत 226 मृत्यू
मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून कुकी आणि मेतेई समुदायांमध्ये आरक्षणावरून हिंसाचार सुरू आहे. सरकारी आकडेवारीनुसार, हिंसाचारात आतापर्यंत 226 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 65 हजारांहून अधिक लोकांनी आपली घरे सोडली आहेत.