- इंदू लक्ष्मण परब, मेणकुरे
माणूस जगतो, मरतो पण मागे राहतात त्या आठवणी. मग आयुष्य त्या एका कप्प्याभोवती फिरत राहतं फुलपाखरू बनून. आयुष्यात अनेक व्यक्ती महत्त्वाच्या असतात, त्यांतील एक म्हणजे आजी-आजोबा. त्यांच्याबरोबर घालवलेल्या आठवणी या न संपणाऱ्याच असतात. त्यांना विशिष्ट असं नाव नसतं. ती सर्वस्व बनून जातात, कधी कधी मित्रही होऊन जातात. या सगळ्यात ती अनमोल अशा आठवणी तयार करतात.
आजी-आजोबांचं जाणं म्हणजे किती भकासपण आयुष्याला येतं हे प्रत्येकानं अनुभवलं असेल. आजोबांचं वर्षश्राद्ध झालं आणि एका महिन्यात आजी आमच्या आयुष्यातून निघून गेली. किती कठीण होतं हे दुःख पचवणं!
मी घरात सर्वात मोठी त्यामुळे साहजिकच सर्वांचीच लाडकी. आजी-आजोबांकडे माझं पारडं थोडं जास्तच जड. लहान असताना आजोबा-आजी कुठंही जावो, मी त्यांच्या बरोबरच असायची. त्यामुळे एक ओढ, एक माया आपणच वाढत गेली. त्यांच्याबरोबर कित्येक ठिकाणी मी फिरले, अगदी हॉस्पिटलमध्येसुद्धा! मला जर घरी जायला उशीर झाला तर कुठे राहिली असेल? असे ती सर्वांना विचारत.
आम्हाला इंग्रजीमध्ये एक पाठ होता, त्यात लेखकाने आपल्या आजीचे वर्णन करून तिच्याबरोबर घालवलेल्या आठवणी सांगितल्या होत्या. तेव्हा मलाही आजी-आजोबांची आठवण यायची. लहान असताना मी त्यांच्याबरोबरच असायची खरी, पण जसजशी मोठी होत गेले तसे त्यांच्याबरोबर वेळ घालवणे कमी झाले. मात्र जर त्यांना डॉक्टरकडे जायचे असेल तर मीच हवी असायचे.
असं म्हणतात की आजी ही दुधावरची साय असते. पण आमची आजी ही संपूर्ण दूधच होती. तिनं केलेला प्रत्येक पदार्थ हा चविष्टच बनायचा. अगदी चटणी, सवरागसुद्धा. तिच्या हातचे लाडू तर सर्वांनाच आवडायचे. ‘खुब्यांचे तोणाक’, ‘अळू’, ‘पोळे’, ‘तांबडी भाजी’ असे कितीतरी खाद्यपदार्थ ती अगदी सहज करायची. आतासारखं चव आणायला काहीच ती वापरत नसे. कशा या गोष्टी एवढ्या चविष्ट होतात याचा उलगडा मला झालाच नाही.
प्रत्येक गोष्टीत ती जीव ओतून टाकायची. घरात कोणीही येवो त्यांचे हसत स्वागत केले जायचे. त्यांची प्रत्येक गोष्ट ही नीट नेटकी असायची. ‘खय गेल्लय गो बाय’ हे वाक्य घरात शिरताना नेहमीच असायचं. त्यामुळे मलाही घराबाहेर पडताना ‘आई येते हं’ म्हणून सांगायची सवयच लागून गेलेली.
आता बाहेर पडताना चुकल्या-चुकल्यासारखं वाटत जातं. मी चहा पिताना तिच्यासाठी हमखास चहा करायची. आता चहा पितानाही तिची आठवण येते.
आपण आज विकसित पिढीमध्ये राहतो. व्यावहारिक विचार करतो. तरीही जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती नाहीशी होते तेव्हा आयुष्य ओकंबोकं वाटू लागतं. आजीवरची माझी माया ही त्यापलीकडची आहे. तिचं अस्तित्व आज नाही पण आठवणी आजही अगदी तशाच ताज्या आहेत. त्या वाटेवरून जाताना लहानपणी मी आजीचा हात पकडून जाताना मला दिसते.