हणजूण परिसरातील ध्वनिप्रदूषणावर कारवाई करण्यासाठी हणजूण पोलीस स्थानकामध्ये तीन पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोवा प्रदूषण मंडळाने ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून त्वरित कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात राज्य सरकारने काल दिली आहे. हणजूण परिसरातील ध्वनिप्रदूषणासंबंधीच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी वरील माहिती देण्यात आली. गोवा प्रदूषण मंडळाकडून ध्वनी नियंत्रक यंत्रणेच्या साहाय्याने ध्वनिप्रदूषणावर देखरेख ठेवली जाणार आहे. ध्वनिप्रदूषण होत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांना त्वरित माहिती दिली जाणार आहे. पोलिसांकडून 30 मिनिटांत कारवाई न केल्यास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली जाणार आहे, अशी माहिती गोवा खंडपीठाला देण्यात आली आहे.