खाण खात्यात कंत्राट पद्धतीवर भरती होणार

0
19

>> राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; मुख्यमंत्र्यांची माहिती; एनजीओंना अडीच लाखांची मदत

राज्यात खाणी सुरू झाल्यानंतर खाण खात्याचा व्याप वाढणार असून, त्या पार्श्वभूमीवर खाण खात्यात कंत्राटी पध्दतीने पदांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. याशिवाय बंद पडलेला ‘खाण पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम’ नव्याने सुरू करण्यात येणार असून आतापर्यंत 20 इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यासाठी संपर्क साधला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आता राज्यातील काही खाणपटट्यांच लिलाव झालेला असून, खाण खात्याचा व्याप वाढणार आहे. त्यामुळे कंत्राटी पध्दतीवर ही भरती करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच गंभीर आजारी असलेल्या किमान 20 रुग्णांची सुश्रुषा करणाऱ्या बिगर सरकारी संघटनांना (एनजीओ) सरकारतर्फे 2.5 लाख रुपये एवढे अर्थसहाय्य देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. राज्यात कर्करोग, ब्रेन स्ट्रोक, स्मृतीभ्रंश तसेच अन्य गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना आश्रय देणाऱ्या व त्यांची सुश्रृषा करणाऱ्या एनजीओंना अर्थसहाय्य देण्याची योजना अर्थसंकल्पात जाहीर केली होती. त्यानुसार आता त्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

माटोळीचे साहित्य ऑनलाईन मागवता येणार

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही चतुर्थीसाठी स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत ऑनलाईन खरेदी करण्याची संधी गोमंतकीयांना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. गोवा सरकारच्या ‘गोवा बाजार डॉट कॉम’ या वेबसाईटवरून माटोळीसाठीचे 14 प्रकारचे साहित्य मागवता येईल. त्यासाठी जैवविविधता मंडळाचे सहकार्य घेतले जाईल. तसेच महिला स्वयंसेवी गटांनी तयार केलेल्या करंजा, लाडू व अन्य साहित्य उपलब्ध असेल.