पणजीतील 8 रस्त्यांची 15 दिवसांत दुरुस्ती

0
6

>> स्मार्ट सिटी प्रशासनाची गोवा खंडपीठात माहिती

पणजी महानगरपालिका क्षेत्रातील 11 रस्त्यांची तातडीची दुरुस्ती आवश्यक आहे. स्मार्ट सिटी प्रशासनाकडून 11 पैकी 8 रस्त्यांची दुरुस्ती येत्या 15 दिवसांत केली जाणार आहे, तर 3 रस्ते पणजी महानगरपालिकेच्या अखत्यारित येत आहेत, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला काल देण्यात आली.
पणजी स्मार्ट सिटीच्या कामाशी संबंधित जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी वरील माहिती देण्यात आली. स्मार्ट सिटीतील 11 रस्त्यांची तातडीची दुरुस्ती आवश्यक आहे. त्यातील 8 रस्ते स्मार्ट सिटीच्या अंतर्गत येत आहेत. या 8 पैकी 7 रस्त्यांची दुरुस्ती रबल सॉलिंगद्वारे केली जाणार आहे. सांतइनेज जंक्शन ते काकुलो मॉल दरम्यानच्या रस्त्याची ड्राय काँक्रिटद्वारे करण्यात येणार आहे, असे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितले.
गोवा खंडपीठाने पणजी महानगरपालिकेला आझाद मैदान ते पोलीस मुख्यालय, आकाशवाणी ते जॉगर्स पार्क आणि सांतईनेज ते कांपाल ट्रेड सेंटर या तीन रस्त्यांच्या दुरुस्ती कामाबाबत शुक्रवारी माहिती देण्याचा निर्देश दिला. त्यातील दोन रस्त्यांची कामे स्मार्ट सिटीच्या अखत्यारित येत नाहीत. आझाद मैदान-पोलीस मुख्यालयासमोर रस्त्याची दुरुस्ती स्मार्ट सिटी प्रशासनाने केली होती. तथापि, पणजी महानगरपालिकेने सदर रस्ता गटार बांधण्यासाठी खोदल्याने सदर रस्त्याची दुरुस्ती महानगरपालिकेला करावी लागणार आहे, असेही ॲड. पांगम यांनी सांगितले.