कोलकातातील घटनेने मी भयभीत : राष्ट्रपती

0
5

कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणानंतर 20 दिवसांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. या घटनेमुळे मी निराश आणि भयभीत झाले. महिलांवरील अत्याचार आता सहनशक्तीच्या पलीकडले झाले आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

राष्ट्रपती मुर्मू यांनी मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या ‘वुमेन्स सेफ्टी : इनफ इज इनफ’ या लेखासंदर्भात पीटीआयच्या संपादकांशी चर्चा करताना या गोष्टी सांगितल्या.
कोणताही सुसंस्कृत समाज आपल्या मुली आणि बहिणींवर असे अत्याचार करू देऊ शकत नाही. समाजाला आता प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. नागरिकांनी स्वत:ला कठीण प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. समाजाची दयनीय मानसिकता महिलांना कमी लेखते. 12 वर्षांपूर्वी झालेल्या निर्भया प्रकरणानंतर अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. मात्र, समाजाने याकडे दुर्लक्ष केले. आपल्या समाजाला सामूहिक स्मृतिभ्रंशाचा त्रास झाल्याचे दिसून येते, या संकटाचा आपण सर्वांनी मिळून सामना केला पाहिजे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 8-9 ऑगस्टच्या रात्री 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.