पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत देशातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने देशातील 12 औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी दिली. या निर्णयानुसार, 9 राज्यांमध्ये 12 स्मार्ट औद्योगिक शहरे तयार करण्यात येणार आहेत. या माध्यमातून तब्बल 10 लाख तरुणांना रोजगार मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार, नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत या 12 स्मार्ट औद्योगिक शहरे तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार तब्बल 28,602 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. देशातील 12 औद्योगिक स्मार्ट शहरांमध्ये उत्तराखंडमधील खुरपिया, महाराष्ट्रातील दिघी, केरळमघील पलक्कड, पंजाबमधील राजपुरा-पटियाळा, उत्तर प्रदेशमधील आग्रा आणि प्रयागराज, बिहारमधील गया, तेलंगणामधील झहीराबाद, आंध्र प्रदेशमधील ओरवाकल व कोपर्थी, राजस्थानमधील जोधपूर व पाली या शहरांचा समावेश करण्यात आला आहे.