डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी 15 सप्टेंबरपूर्वी अध्यादेश

0
11

आयएमए सदस्यांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

राज्यातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी येत्या 15 सप्टेंबरपूर्वी वैद्यकीय आस्थापने कायदा (क्लिनिकल ॲस्टॅब्लिशमेंट ॲक्ट) अध्यादेश जारी करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केली. आल्तिनो-पणजी येथे घेतलेल्या आयएमए सदस्य आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, राज्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार व इतरांची उपस्थिती होती.

राज्यातील गोमेकॉ इस्पितळ, जिल्हा इस्पितळ व इतर इस्पितळांतील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी साधनसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे अमानवी कृत्य घडू नये याची काळजी घेतली जाणार आहे. राज्यातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याची तयारी आहे. कायद्यातील सुधारणांसाठी आयएमएने आपल्या सूचना सादर कराव्यात. राज्यात वैद्यकीय क्षेत्रातील दुर्घटनेबाबत एफआयआर नोंदणीमध्ये हयगय केली जाऊ नये, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सनी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी अधिक सुरक्षा उपाय प्रदान करण्यासाठी वैद्यकीय आस्थापने कायदा अधिक मजबूत आणि सुधारित करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार कायदेशीर सुधारणांच्या या शिफारशीला मान्यता दिली जाणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.