मोंत क्रूझ यांचे निधन

0
7

बाणावलीचे माजी आमदार व माजी क्रीडामंत्री फ्रान्सिस्क मोंत द क्रूझ (79) यांचे काल पहाटे निधन झाले. पक्षाघाताचा झटका आल्यानंतर काही वर्षांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. काल रात्री अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान पहाटे त्यांचे निधन झाले.
मोंत क्रूझ हे 1980 च्या विधानसभा निवडणुकीत अर्स काँग्रेसमधून बाणावली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेसचे गोव्यात पहिल्यांदा सरकार स्थापन झाले तेव्हा मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या मंत्रिमंडळात मोंत क्रूझ क्रीडामंत्री होते. त्यांनी 1983 मध्ये अवघ्या 6 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम उभे करण्यात मोलाचे योगदान दिले होते. तसेच ते यशस्वी उद्योजकही होते. इम्पाला हा त्यांचा बियर उत्पादनाचा कारखाना होता.
त्यांच्या पश्चात पत्नी मोनिका, पुत्र विजय, कन्या हेमा, आशा आणि डॉ. निशा असा परिवार आहे. त्यांची कनिष्ठ कन्या डॉ. निशा ऑस्ट्रेलियात स्थायिक असून, त्या बुधवारी गोव्यात पोहचणार आहेत. गुरुवार दि. 29 रोजी मोंत क्रूझ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.