कंत्राटदाराविरुद्ध एफआयआर दाखल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीनंतर हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे, त्यात पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पुतळ्याच्या संरचनेत वापरलेले नट आणि बोल्ट, तसेच स्टील गंजले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
भारतीय नौदल दिनानिमित्त 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा कोसळल्या प्रकरणी आता कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या अनेक कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपांमध्ये संगनमत, फसवणूक आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणे यांचा समावेश आहे.
दरम्यान, या शिवपुतळ्याच्या दुरवस्थेबद्दल स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी यापूर्वीच चिंता व्यक्त केली होती.