- डॉ. मनाली महेश पवार
जून-जुलै महिन्यांत पावसाने नुसता हैदोस घातला. सगळ्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये उलथापालथ तर केलीच, त्याचबरोबर बऱ्याच जणांचे आरोग्य-स्वास्थ्य बिघडवून टाकले. आणि आताही अचानक पडणाऱ्या ऊन-पावसाच्या खेळाने शरीर-मानसस्वास्थ्याचे चक्रच बिघडवून टाकले आहे. अशा या वातावरणाचा विचार करता प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
जून-जुलै महिन्यांत पावसाने नुसता हैदोस घातला. सगळ्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये उलथापालथ तर केलीच, त्याचबरोबर बऱ्याच जणांचे आरोग्य-स्वास्थ्य बिघडवून टाकले. रोजचे पावसाळ्यातले जंतुसंसर्गाने होणारे आजार बळावले. सर्दी-ताप-खोकला-दमा या श्वसनमार्गाच्या रोगांनी बऱ्याच जणांना हैराण केले. त्यातच डेंग्यू-मलेरियानेही भर घातली. या आजारांतून बाहेर पडता पडता अचानक पावसाने विश्रांती घेतली आणि परत हवामानात बदल झाला. आता कुठे पावसाच्या गारव्याशी, आद्रतेशी शरीर जुळवून घेत होते, तर अचानक पडणाऱ्या ऊन-पावसाच्या खेळाने शरीर-मानसस्वास्थ्याचे चक्रच बिघडवून टाकले.
वातावरणात बाह्य तापमान वाढले आहे. पण मध्येच येणाऱ्या पावसामुळे बाह्य तापमान 10-20 डिग्री सेंटिग्रेड अंशाने कमी होते व अचानक वातावरणात गारवा येतो. यामुळे वातदोष अधिकच वाढतो. त्याचबरोबर गरम वातावरणामुळे पित्तदोष साठण्याबरोबर वाढायलाही सुरुवात होते. शरीराग्नी मंद झाल्याने पचनही खालावते, जंतुसंसर्ग वाढतो, त्याचबरोबर संसर्गजन्य रोग वाढीस लागतात. अशा या वातावरणाचा विचार करता प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
सध्या मध्येच येणाऱ्या पावसामुळे वाढणारे आजार-
- श्वसनमार्गाचे, पचनसंस्थेचे, जंतुसंसर्गाचे आजार परत एकदा बळावले आहेत.
- आत्ता आत्ता सर्दी, खोकला, दम्याचा त्रास, ताप इत्यादी बरे झालेले आजार परत डोके वर काढून सतावू लागले आहेत. एखाद्या साथीसारखे पसरत आहेत.
- त्याचबरोबर भूक न लागणे, पोट जड होणे, मलावरोध किंवा जुलाब, उलट्या, जंत, कावीळसारखे पचनसंस्थेचे आजारही जास्त प्रमाणात त्रास करू लागले आहेत.
- डेंग्यू, मलेरिया, स्वाइनफ्लूसारखे आजारही उद्भवू लागले आहेत.
- मनाला थोडी उभारी वाटते, परत निरुत्साह होतो, त्यामुळे चिडचिड काही अंशी वाढलेली दिसते.
- संधिवाताचा, मूळव्याधाचा त्रासही बळावतो, त्याचप्रमाणे त्वचारोगही जास्त प्रमाणात उद्भवू लागतात.
आजार बळावण्याची कारणे
- अवेळी व खाल्लेले पचन झाले नसतानादेखील खाणे.
- तेलकट, मसालेदार, चटपटीत अतिप्रमाणात खाणे.
- फास्ट फूड, जंक फूड, पॅकेटबंद फूड, रेडी टू यूज फूडचा अतिरेक.
- आइस्क्रीम, शीतपेये, फ्रीजमधील खाणे वर्षाचे बाराही महिने तसेच चालू ठेवणे.
- व्यायामाचा अभाव, बैठे काम.
- दिवसा झोपणे आणि रात्री जागरण.
- मोबाईल, टीव्ही म्हणजे स्क्रीनटाइमचा अतिरेक.
या सगळ्या चुकीच्या आहार-विहाराच्या सवयीने बाह्यवातावरणातील बदल शरीर सात्म्य करून घेऊ शकत नाही व यातूनच विविध आजारांची उत्पत्ती होते.
आहार-विहार कसा असावा?
0 सर्वांगास नेहमी वातशामक तेलाने अभ्यंग करावे किंवा नारळाचे तेल सर्वांगाला नेहमी लावावे. त्यानंतर कोमट पाण्याने स्नान करावे.
0 वैद्याच्या सल्ल्याने पंचकर्मापैकी बस्ती (एनिमा) घ्यावा.
0 आहारामध्ये इतर तेलांबरोबर एरंड तेलाचाही वापर करावा.
0 रोज सकाळी चमचाभर नारळाचे तेल प्यावे व वरून गरम पाणी प्यावे.
0 जेवणात तेल व तुपाचा मुक्तहस्ताने वापर करावा.
0 जुलाब होत असल्यास चमचाभर आल्या-लिंबाचा रस घ्यावा. दिवसभर फक्त ताक-भात किंवा दही-भात किंवा मुगाचे कडण घ्यावे.
0 उलट्या होत असल्यास साळीच्या लाह्या कोरड्याच खाव्यात. डाळिंबाचा रस खडीसाखर टाकून थोडा थोडा पीत राहावा व लंघन करावे.
0 सर्दी, घसा दुखणे, तापासारखे वाटणे, अंगदुखी असल्यास तुळस, मिरे, अडुळसा, कांदा, लवंग, ज्येष्ठमध इत्यादी टाकून तयार केलेला काढा दिवसातून दोन वेळा सलग एक आठवडा घ्यावा.
0 तसेच वैद्याच्या सल्ल्यानेच सीतोपलादी चूर्ण गरम पाण्याबरोबर सकाळ-संध्याकाळ घ्यावे.
0 लहान मुलांना द्यायचे झाल्यास सीतोपलादी चूर्ण पाव चमचा दुधात टाकून द्यावे.
0 पोट जड होऊन फुगल्यासारखे वाटत असेल, गॅस होत असेल, अपचन या सर्व तक्रारींवर पाव चमचा हिंग्वाष्टक चूर्ण सुरुवातीलाच जेवणाच्या पहिल्या घासात तुपाबरोबर घ्यावे.
0 मलावरोध-मूळव्याधीचा त्रास असल्यास रोज रात्री जेवणानंतर अविपत्तीकर चूर्ण, त्रिफला चूर्ण, आरग्वध मगज गरम पाण्याबरोबर वैद्याच्या सल्ल्याने घ्यावे.
0 खोकला-दम्याचा त्रास सतावत असेल तर वासावलेह रसात संध्याकाळी चाटून खावा.
वरील सर्व घरच्या औषधोपचारांबरोबर आहारांमध्येही बदल करणे अपेक्षित आहे.
आहार असा असावा
- ताजा, घरचा गरम व हलका आहार सेवन करावा.
- पचायला जड अन्न टाळावे. दही, चीज, पनीर, मिठाई, अंडी, चिकन, मटण यांसारखे अन्नपदार्थ टाळावेत.
- दुपारी साधे जेवण असता रात्रीसुद्धा मुगाचे कढण, रव्याची लापशी, भाज्यांचे सूप असा द्रवाहार असावा.
- बाहेरील उघड्यावरचे खाणे पूर्णपणे टाळावे.
- आईस्क्रीम, शीतपेये टाळावीत.
- हिंग, जिरे, धणे, दालचिनी, तामलपत्र, आले, हळद, मिरे, सुंठ इत्यादी मसाल्यांचा वापर करावा.
- या काळात आले व त्यापासून तयार केलेली सुंठ वापरावी. भाज्या, आमटी किंवा सूप करतानाही तिखटापेक्षा आले किंवा सुंठीचाच वापर करावा.
- दुधात चिमूटभर सुंठीचे चूर्ण टाकावे.
- पिण्यासाठी पाणी वापरताना ते पाणी उकळूनच प्यावे.
आहाराची पथ्ये पाळल्यास औषधांची गरज भासत नाही, त्याचप्रमाणे अर्धा आजार असाच योग्य आहार सेवन केल्याने टळतो. पथ्यकर आहार सेवनाने औषधांचाही परिणाम पुरेपूर होतो. अशा काळात आहाराचे पथ्य कटाक्षाने पाळणे आवश्यक ठरते.
कसे वागावे?
0 पाऊस हा सध्या कसाही व केव्हाही येऊ शकतो, त्यामुळे काम नसताना शक्यतो बाहेर पडू नये.
0 बाहेर जाताना छत्री किंवा रेनकोट अवश्य जवळ बाळगावा.
0 शारीरिक श्रमांचा अतिरेक करू नये.
0 कोमट पाण्यानेच नेहमी स्नान करावे.
0 हवा शुद्ध करण्यासाठी वेखंड, सुंठ, ओवा, कडुनिंबाची सुकवलेली पाने, धूप घालून धुपन करावे.
0 रात्री जागरण करू नये, तसे दिवसा झोपू नये.
अशा प्रकारच्या हितकर आहार-विहाराचे आचरण करावे, म्हणजे अशाप्रकारचे आजार जे मधे मधे पाऊस पडल्यामुळे उत्पन्न होतात ते टाळता येतील.