धुमसते बलुचिस्तान

0
13

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये सध्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ह्या दहशतवादी संघटनेने आकांत मांडला आहे. एकामागून एक दहशतवादी हल्ले होत आहेत. त्यांनी पोलीस स्थानके जाळली, रेलमार्ग उद्ध्वस्त केले आणि महामार्ग रोखून एका बसमधील 23 प्रवाशांना ठार मारले. मुख्य म्हणजे हा अंदाधुंद गोळीबार नव्हता. बसमधील प्रवाशांची ओळखपत्रे तपासून फक्त पाकिस्तानातील पंजाबी वंशाच्या नागरिकांना उतरवून त्यांना ओळीने उभे करून ठार मारण्यात आले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने ह्या हल्ल्याची जबाबदारी घेतली असल्याने पाकिस्तानने आजवर चालवलेल्या शोषणाविरुद्धचा बलुचींचा उठाव असे स्वरूप ह्या दहशतवादी हल्ल्यांना प्राप्त झाले आहे. बलुचिस्तान हा खरे तर पाकिस्तानचा सर्वांत मोठा, परंतु विरळ लोकवस्तीचा प्रांत. परंतु एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे इराण ह्या दोन्ही भागांत पसरलेल्या बलुची टोळ्यांनी आपली अस्मिताच महत्त्वाची मानली आहे. पाकिस्तानी राजवट किंवा पाकिस्तानी लष्कराचा वरचष्मा पाक – बलुचिस्तानातील बलुची नागरिकांनी कधीच मान्य केला नाही. त्याचा वचपा म्हणून पाकिस्तान सरकारने त्या प्रांताची सतत उपेक्षा चालवली. विरोधाचे सूर काढणाऱ्यांना हाल हाल करून ठार मारले गेले. किती बलुची आंदोलक आजवर बेपत्ता झाले ह्याचा तर हिशेबच नाही. चीनच्या साह्याने तेथील नैसर्गिक संसाधनांवर तो सतत डल्ला मारतो आहे. त्यामुळे बलुची राष्ट्रवादी गट पाकिस्तानी प्रशासन आणि लष्कराविरुद्ध पेटून उठले आहेत. त्यातूनच ह्या दहशतवादाला तोंड फुटले आहे असे दिसते. पाकिस्तानी प्रशासन आणि लष्करावरील तेथील पंजाब्यांचे वर्चस्व नवे नाही. त्यामुळे बलुचीस्तानमध्ये वावरणाऱ्या ह्या परप्रांतीयांना सध्या लक्ष्य केले जाताना दिसते आहे. ज्यांना ठार मारले गेले ते सगळे साध्या कपड्यांतील पाकिस्तानी लष्करी जवान होते व म्हणूनच ओळखपत्रे पाहिल्यावर त्यांना ठार मारले गेले असे बीएलएचे म्हणणे आहे. काही असो, ह्या दहशतवादाच्या नव्या उठावामुळे बलुचिस्तान पुन्हा धुमसू लागले आहे एवढे खरे. या वर्षीच ग्वादार बंदरावर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देणारा भीषण हल्ला बलुची लिबरेशन आर्मीच्या मजीद ब्रिगेडच्या आठ दहशतवाद्यांनी केला होता. स्फोटांमागून स्फोट घडवून पाकिस्तान आणि त्याचा पाठीराखा असलेल्या चीनला तेव्हा दहशतवाद्यांनी ललकारले. त्यानंतरही सतत अधूनमधून परप्रांतीयांना, विशेषतः पाकिस्तानी पंजाबी नागरिकांना लक्ष्य केले जात आले आहे. पाकिस्तान – इराण रेलमार्ग दहशतवाद्यांचे लक्ष्य दिसतो. शिवाय क्वेटाला जोडणारा रेल्वेपूलही उडवून देण्याचा प्रयत्न केला गेला. चीनच्या साह्याने बलुचिस्तानमधील नैसर्गिक संसाधनांची लूट पाकिस्तान करीत असल्याने त्या प्रकल्पांवर काम करणारे कामगार तर बलुची दहशतवाद्यांचे नेहमीच लक्ष्य राहिले आहेत. पिढ्यानपिढ्यांचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक शोषण असे दहशतवादाला खतपाणी घालू लागले आहे. बलुचिस्तानच्या पश्चिम भागात सोन्याच्या आणि तांब्याच्या खाणी आहेत. दक्षिणेस ग्वादारचे बंदर आहे. ह्या प्रकल्पांचा बलुची नागरिकांना काहीही फायदा मिळत नाही ही स्थानिकांची नेहमीची तक्रार राहिली आहे. हा सारा प्रांत पराकोटीचा अविकसित राखण्यात आला आहे. चीनच्या आर्थिक पाठबळावर जे प्रकल्प सुरू आहेत, त्याचा फायदाही उर्वरित पाकिस्तान ओरपतो आहे. त्यामुळेच दहशतवादाची ही आग भडकत चालली आहे. चीन आणि पाकिस्तानच्या ह्या संयुक्त प्रकल्पांवर काम करणाऱ्या मजुरांना सातत्याने बलुची दहशतवादी लक्ष्य करीत आले आहेत. सध्या तर पंजाब प्रांतातून येणारी जाणारी वाहने अडवून जाळली जात आहेत. गेल्या एप्रिलमध्ये वाहनांतून उतरवून नऊ लोकांची अशाच प्रकारे हत्या झाली होती. काल 23 जणांना त्याच पद्धतीने ठार मारले गेले. ह्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात पाकिस्तानी लष्कराने सूडसत्र आरंभले आहे. डझनाहून अधिक दहशतवाद्यांना प्रत्युत्तराच्या कारवाईत ठार मारल्याचा दावा पाकिस्तान सरकारने नुकताच केला आहे. परंतु ही आग भडकत चालली आहे हे सध्याच्या हल्ल्यांची व्यापकता पाहता स्पष्ट दिसून येते. ह्या सगळ्या हिंसाचाराला भारताला जबाबदार धरून तिकडे बोट दाखवले जाईल. परंतु पाकिस्तानचा हा अंतर्गत प्रश्न आहे आणि वर्षानुवर्षांच्या असंतोषाला जर असे तोंड फुटले असेल तर त्याचे खापर भारताच्या माथी मारता येणार नाही. बलुचिस्तानमधील नागरिकांचा उठाव आणि त्यातूनच उफाळलेला दहशतवाद रोखायचा असेल तर पाकिस्तानला बलुची नागरिकांप्रती चालवलेला सापत्नभाव थांबवावा लागेल. लष्कराद्वारे चालवलेले छळसत्र थांबवावे लागेल. अन्यथा बलुचिस्तान धुमसत राहील.