मालवणातील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला

0
8

जवळपास आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनाचे (4 डिसेंबर 2023) औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. हा पुतळा दुर्दैवाने काल कोसळला. त्यामुळे विरोधकांनी महाराष्ट्र सरकार आणि या पुतळ्याचे अनावरण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. या घटनेचा निषेध म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी मालवणमधील सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालय काल फोडले.

राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा हा पुतळा 35 फुटांचा होता. मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनारी नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळी पंतप्रधानांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. शिवाजी महाराजांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात. या पार्श्वभूमीवर नौदलाच्या वतीने 4 डिसेंबर 2023 चा नौदल दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.