राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय शिक्षण

0
6
  • दिलीप वसंत बेतकेकर

‘सुरुवातीला वावभर चुकलं की पुढे गावभर चुकायला होतं’ अशी एक म्हण आहे. आपल्या देशाला ही म्हण बऱ्याच अंशी लागू पडते. शेकडो वर्षांच्या प्रदीर्घ गुलामगिरीनंतर 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्व-तंत्र उभं करायला हवं होतं. सर्व व्यवस्था आपल्या स्वतःच्या तंत्राने, स्वतःच्या तंत्रानुसार उभ्या करायला हव्या होत्या. विशेषत्वाने शिक्षण हा सर्व विकासाचा पाया असल्यामुळे ते भारताच्या ‘स्वभावा’नुसार, स्वतःच्या ‘दर्शना’नुसार असायला हवे होते.

‘सुरुवातीला वावभर चुकलं की पुढे गावभर चुकायला होतं’ अशी एक म्हण आहे. आपल्या देशाला ही म्हण बऱ्याच अंशी लागू पडते. शेकडो वर्षांच्या प्रदीर्घ गुलामगिरीनंतर 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्व-तंत्र उभं करायला हवं होतं. सर्व व्यवस्था आपल्या स्वतःच्या तंत्राने, स्वतःच्या तंत्रानुसार उभ्या करायला हव्या होत्या. विशेषत्वाने शिक्षण हा सर्व विकासाचा पाया असल्यामुळे ते भारताच्या ‘स्वभावा’नुसार, स्वतःच्या ‘दर्शना’नुसार असायला हवे होते.
पण नेमकी इथेच गडबड झाली. इथेच वावभर चुकलं. परिणामतः पुढे पुढे खूपच चुकलं. अनेक बाबतीत आपण भरकटत गेलो. आपल्या दार्शनिक राष्ट्रपुरुषांनी सुचवलेल्या मार्गावरून जाण्यापेक्षा आपण गुलामीच्याच मार्गावरून चालत राहिलो.
नानी पालखीवाला हे ज्येष्ठ विधिज्ञ एकदा म्हणाले,”When India became free, the first duty of the government should have been to see that our priceless heritage was made widely known and that our young men and women were made to understand how fantastically rich our country is in its spiritual and intellectual powers.’

  • भारत स्वतंत्र झाल्यावर सर्वप्रथम आपल्या युवा पिढीला आपल्या अमूल्य सांस्कृतिक आणि बौद्धिक वारशाची ओळख करून द्यायला हवी होती. ते पुढे म्हणतात, ‘आंतरिक आणि बाह्य दारिद्य्र अशी दोन प्रकारची दारिद्य्रे असतात. सुयोग्य, प्रभावी आर्थिक नियोजनाने बाह्य दारिद्य्र संपवता येते, पण आंतरिक दारिद्य्र संपवण्यासाठी आपल्या प्राचीन साहित्याचे अध्ययन हवे.
    पण दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर सर्व राष्ट्रपुरुषांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करून जे जे पाश्चात्त्य तेच सर्वश्रेष्ठ असा गैरसमज करून घेऊन आपल्या स्वतःच्या मार्गाने न जाता जुन्याच पाश्चात्त्य मार्गाने जात राहिलो. किंबहुना जे जे या देशातले, या मातीतले, इथल्या महापुरुषांनी सांगितले त्या सर्वांची अवहेलनाच झाली. जे जे इथले ते प्रतिगामी, कालबाह्य, बुरसटलेले अशी एक विचित्र आणि पराभूत मानसिकता झाली.
    ब्रिटिश इतिहासकार सी. एच. फिलीप लिहितो, ‘आतापर्यंत भारताचा इतिहास ब्रिटिश विद्वानांच्या विश्लेषणानुसार लिहिला गेला. आता भारतीय आपला इतिहास कसा लिहितात ते बघायला हवे.’

स्वातंत्र्यलढा सुरू असतानाही आपले शिक्षण कसे असावे यासंबंधी आपल्या राष्ट्रपुरुषांनी वेळोवेळी केवळ विचारच व्यक्त केले असे नाही, तर लोकमान्य टिळकांनी ‘राष्ट्रीय शिक्षण’ हे एक महत्त्वाचे सूत्र मांडून विलायती मालच नव्हे तर विलायती शिक्षणावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय शिक्षणाची त्यांची व्याख्या फार सोपी आणि सुटसुटीत आहे. ते म्हणतात, ‘राष्ट्रपुरुषाची सर्व तऱ्हेने उन्नती करणारे आणि राष्ट्रीयत्वाची ओळख करून देणारे ते राष्ट्रीय शिक्षण होय.’
विद्यार्थी आणि शिक्षकांकडून टिळकांच्या किमान अपेक्षा आहेत. ते म्हणतात, ‘शिष्य ज्या राष्ट्राचा अवयव आहे ते राष्ट्र सुधारलेल्या राष्ट्रांच्या बरोबरीने वाढावे आणि त्याकरिता त्या शिष्याने उपयोग करावा आणि अशा प्रकारचा उद्योग तो करील अशी आपल्या शिक्षणाने त्याच्या मनात हिंमत यावी अशी गुरूची इच्छा असली पाहिजे.’

महर्षी अरविंद घोषांना त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलावर भारतीय संस्कृतीची सावलीसुद्धा पडता कामा नये म्हणून अगदी बालवयात शिक्षणासाठी विदेशात ठेवले होते. पण अरविंदांच्या मातृभूमीप्रेमाचा अंकुर मुळीच नष्ट झाला नाही. त्यांचं जीवन ओतप्रोत राष्ट्रभावाने भरलेले होते. कमलदलावर चिखलाचा जसा काहीच परिणाम होत नाही, त्याचप्रमाणे अरविंदांवरही पाश्चात्त्य संस्कृतीचा मुळीच परिणाम झाला नाही. राष्ट्रीय शिक्षणासंबंधी ते म्हणतात, ‘भूतकाळापासून प्रारंभ करून वर्तमानकाळाचा उपयोग करत महान राष्ट्र घडविण्यासाठी जे शिक्षण दिले जाते ते राष्ट्रीय शिक्षण.’
1907 मध्ये नॅशनल कॉलेजमधून त्यागपत्र देऊन बाहेर पडताना अरविंद म्हणाले, ‘केवळ माहिती डोक्यात कोंबण्याचा आमचा कधीच हेतू नव्हता. तसेच जीविकार्जनासाठीच संधी उपलब्ध करून देणे हाही आमचा उद्देश नव्हता. मातृभूमीच्या सेवेसाठी जे आपले जीवन व्यतीत करतील आणि कष्ट घेतील असे सुपुत्र निर्माण व्हावेत हीच आमची इच्छा.’
बिपिनचंद्र पालांनी तर इंग्रजी शिक्षणाचं मोठं मार्मिक वर्णन केलं आहे. ते म्हणतात, ‘आमचं चरित्र विदेशी आधारावर अंकुरित झालं आहे. केवळ बीजच विदेशी नसून कुंडीही विदेशी आहे. आमचं पौरुष त्या विदेशी कुंडीत व्हरांड्यात वेलीसारखं निराधार झुलत आहे. या वेलीची मुळं देशाच्या जीवन, समाज आणि परंपरेत बिलकूल नाहीत.’

स्वामी विवेकानंदांनी शिक्षणासंबंधी मूलभूत विचार मांडले, ‘शिक्षण म्हणजे केवळ माहितीचे गाठोडे नव्हे. चैतन्याने मुसमुसलेले, चारित्र्य घडवणारे, पुरुषार्थ प्रदान करणारे ते शिक्षण.’ केवळ ब्रिटिश घराण्यांच्या सनावळ्या आणि नामावळ्या यांची घोकंपट्टी करायला लावणारे शिक्षण त्यांना अभिप्रेत नाही. आध्यात्मिक आणि लौकिक शिक्षणाचा त्यांनी आग्रह धरला. शिक्षणातून राष्ट्रीय शिक्षणाची निर्मिती व्हायला हवी ही त्यांची अपेक्षा आहे. केवळ धनदौलत देऊन एका छोट्याशा गावाचासुद्धा विकास होणार नाही. आत्मनिर्भर होण्याचे- आत्मोद्धाराचे शिक्षण द्यायला हवे, ही त्यांची सूचना आजच्या राजकीय पक्षांनी मतांसाठी मोफत वस्तू वाटताना ध्यानात घ्यायला हवी. देणाऱ्या आणि घेणाऱ्यांनाही हे परावलंबित्व आहे हे दुर्दैवाने लक्षात येत नाही.

‘भारतीय विद्यापीठांनी कारकून व वकील पैदा करण्याऐवजी अभ्यासक्रमात असे परिवर्तन करणे आवश्यक आहे, जेणेकरून देशभक्त तरुण निर्माण होतील.’
संस्कृत भाषा ही मृत भाषा असा उपहास केला जातो. स्वामी विवेकानंद संस्कृतभाषा शिक्षणाचे आग्रही आहेत. ‘संस्कृत भाषेचे शिक्षणही आवश्यक आहे. संस्कृतच्या ज्ञानाअभावी हिंदू युवक आपल्या समृद्ध संस्कृतीशी अनभिज्ञ राहतील,’ असा इशारा द्यायला ते विसरत नाहीत.

‘भारताला आपण ‘भारत’ आहोत हे विसरून चालणार नाही,’ असे स्पष्टपणे रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे. पण दुर्दैवाने भारतात ‘भारत, भारतीयत्व यांनाच सध्या विरोध होतोय. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ अशा घोषणा विद्यापीठांच्या आवारातच दिल्या जातात यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही. रवींद्रनाथ अत्यंत आर्ततेने साद घालतात. ते म्हणतात, ‘एक बार तोरा माँ बोलिया डाक (एकदा तरी भारत मातेला माँ म्हणून हाक मारून बघ), तुझ्यात प्रचंड शक्ती असल्याची अनुभूती येईल.’
युद्धाचे तीन प्रकार सांगितले जातात. 1) शारीरिक युद्ध, 2) वाणिज्ययुद्ध आणि 3) बुद्धियुद्ध. ‘बुद्धिर्यस्य बलं तस्य’ असं म्हणतात. बुद्धियुद्धात बुद्धी मोहीत, भ्रमिष्ट करून आत्माभिमान आणि आत्म-शक्तीवर अविश्वास निर्माण करणे हा या युद्धाचा मुख्य हेतू असतो. त्यामुळे आत्मग्लानी येते. अशा आत्मग्लानीतून समाजाला बाहेर काढणे हा शिक्षणाचा प्रधान हेतू असावा. आपल्या राष्ट्रपुरुषांनी याकडे वारंवार लक्ष वेधले आहे. राष्ट्रीय उत्सवाच्या निमित्ताने या राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयावर विचार करूया!