टॅक्सी व्यावसायिक आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

0
5

>> पाचव्या दिवशी तोडगा निघण्याची शक्यता

पेडणे तालुक्यातील मोप इंटरनॅशनल विमानतळावरील सर्व टॅक्सी व्यावसायिकांच्या एकंदरीत सहा मागण्या आहेत. त्या मागण्यांची पूर्तता सरकारने करावी यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेकडो टॅक्सी व्यावसायिकांनी मागच्या चार दिवसांपासून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. आज सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी टॅक्सी व्यावसायिकांना पणजी येथे भेटण्यासंबंधी लेखी पत्र दिले आहे. त्यानुसार हे व्यावसायिक आज मुख्यमंत्र्यांना भेटणार असून यावेळी तोडगा निघण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या निर्णयाने जर व्यावसायिकांचे समाधान झाले, तर या आंदोलनाला पूर्णविराम मिळणार आहे.

जोरदार पावसाची पर्वा न करता पेडणे तालुक्यातील अनेक टॅक्सी व्यावसायिकांनी पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. एका बाजूने टॅक्सी व्यावसायिकांना व्यवस्थित व्यवसाय मिळत नाही. जी वाहने बँक च्या कर्जातून घेतलेली आहेत. ते बँकेचे हप्ते वेळेवर भरताही येत नाहीत. त्यामुळे या व्यावसायिकांसमोर गंभीर समस्या दिवसेंदिवस निर्माण झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी टॅक्सी व्यवसायातील आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे टॅक्सी व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री आम्ही आंदोलन करत आहोत त्या ठिकाणी का भेट देत नाहीत असाही प्रश्न व्यावसायिकांनी यावेळी उपस्थित केला. आमदार आर्लेकर, आरोलकर यांनी सरकारच्या बाजूने व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.
परंतु या चार दिवसात त्यांना यश आले नाही. आज मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी घेतलेला निर्णय जर समाधानकारक झाला, तर आज पाचव्या दिवशी टॅक्सी आंदोलनाला पूर्णविराम मिळू शकतो.

वाढता पाठिंबा

पेडणे शहरामध्ये मागच्या चार दिवसांपासून टॅक्सी व्यावसायिकांचे हे शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाच्या ठिकाणी आतापर्यंत दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, आमदार क्रुझ डिसिल्वा, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रे आमदार जीत आरोलकर, उत्तर गोवा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष दीपक कळंगुटकर, सामाजिक कार्यकर्ते राजन घाटे, सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर ,टॅक्सी संघटनेचे भास्कर नारुलकर मांद्रेचे माजी सरपंच ॲड. अमित सावंत, नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या. व्यावसायिकांचे प्रश्न समस्या ऐकून घेतल्या.