राज्यात आजही मुसळधार पाऊस

0
10

हवामान खात्याचा केशरी रंगाचा इशारा

हवामान खात्याने काल रविवारप्रमाणेच आज सोमवारीही राज्याला केसरी रंगाचा इशारा दिलेला असून राज्यातील काही भागांत आज अतिमुसळधार तर काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. उत्तर तसेच दक्षिण गोव्यातील काही भागांत अतिमुसळधार तर काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. परवा शनिवार दि. 24 ऑगस्ट रोजी राज्यात मुसळधार पाऊस कोसळला होता. आणि हवमान खात्याकडे नोंद झालेल्या पावसाचे प्रमाण हे सुमारे 3 इंच एवढे होते तर गेल्या 48 तासांत राज्यात कोसळलेल्या पावसाचे प्रमाण हे तब्बल 8 इंच एवढे आहे.
दरम्यान गेल्या 24 तासात पेडणे येथे सर्वाधिक 160 मी. मी., वाळपई येथे 141.5 मी. मी., केपे येथे 138 मी. मी., दाबोळी येथे 134 मी. मी., म्हापसा येथे 130 मी. मी., सांगे येथे 124.8 मी. मी., मुरगाव येथे 119.8 मी. मी., जुने गोवे येथे 116.3 मी. मी., पणजीत 111.6 मी. मी., मडगावात 107 मी. मी., काणकोण येथे 99.2 मी. मी., तर फोंडा येथे 80.8 मी. मी., एवढा पाऊस कोसळला.

सरासरीपेक्षा 42 टक्के अतिरिक्त पाऊस

आतापर्यंत राज्यात कोसळलेल्या हंगामी पावसाचे प्रमाण हे 2628.6 मी. मी. एवढे असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केलेले असून आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे 42.8 टक्के एवढा अतिरिक्त पाऊस झाल्याचे म्हटले आहे. यंदा झालेला पाऊस हा विक्रमी पाऊस असून या अतिमुसळधार पावसामुळे राज्यात निसर्गाचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झालेले असून जीवितहानीही झालेली आहे.

मोठे नुकसान

1 जून ते 31 जुलै या दरम्यान पाऊस व वादळी वाऱ्यामुळे राज्यातील 1869 एवढे वृक्ष उन्मळून पडलेले आहेत. त्यापैकी 714 झाडे ही घरांवर कोसळल्याने मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत राज्यात घरे कोसळल्याने झालेले नुकसान हे अंदाजे 1.46 कोटी रु. एवढे आहे. त्याशिवाय झाडे वाहनांवर व अन्य मालमत्तेवर कोसळून पडल्यामुळे झालेले नुकसान हे वेगळे असून राज्यातील भातशेती व भाजीशेतीचेही करोडो रु. चे नुकसान झालेले आहे. शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यात येत असल्याचे कृषिखात्याचे संचालक संदीप फळदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.

6 राज्यांमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान खात्याने गोवा, महाराष्ट्र, गुजरात कर्नाटक व राजस्थानमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार पावसाची उत्तर प्रदेश, पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, बिहार, झारखंड, ओडिशा, आसाम आणि मेघालय, त्रिपुरा, केरळ, किनारी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी 7 सेमीपर्यंत पावसाची शक्यता आहे. त्रिपुरात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 27 जूनपासून 23 ऑगस्टपर्यंत, पावसाशी संबंधित घटनांमध्ये 140 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे