मोदी युक्रेनमध्ये

0
23

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पोलंड दौऱ्यानंतर युक्रेनच्या भेटीवर गेले आहेत. रशिया – युक्रेनदरम्यान गेले 30 महिने सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरची ही भेट आहे आणि साहजिकच त्याकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. अर्थात, युद्धकाळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ वगैरे अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी युक्रेनला भेट दिलेली आहे. मात्र, मोदींच्या युक्रेन भेटीची पार्श्वभूमी वेगळी आहे. भारत आणि रशिया हे मित्रदेश म्हणून आजवर जगाला सुपरिचित आहेत. गोव्याच्या मुक्तीपासून काश्मीरवरील भारताच्या अधिकारापर्यंत प्रत्येक वेळी रशियाने भारताचे समर्थन केले आहे. त्यामुळे युक्रेनवर रशियाने लष्करी कारवाई केली, हल्ले चढवले, तरी भारताने रशियाचा थेट निषेध करणे आजवर टाळले आहे. रशियाकडून भारताने तेलाची आयात करू नये यासाठी अमेरिकेने मोठा दबाव आणला, तरी त्यालादेखील भारताने भीक घातलेली नाही व रशियाकडून सवलतीच्या दरातील तेल आयात सुरूच ठेवली आहे. काही काळापूर्वी स्वतः मोदी रशियात पुतीन यांच्या भेटीस गेले होते. नेमके त्याच वेळी रशियाने युक्रेनमधील मुलांच्या इस्पितळावर बॉम्बहल्ला केला होता व त्यात 45 मुले ठार झाली होती, तर शेकडो जखमी झाली होती. मोदींच्या रशिया दौऱ्यादरम्यान हा हल्ला झाल्याने भारतासाठी ती घटना अतिशय अडचणीची ठरली होती. तेव्हा देखील भारत सरकारने मोघमपणे तशा प्रकारच्या हल्ल्यांचा निषेध केला होता, परंतु नंतर मोदी – पुतीन गळाभेट ठरल्याप्रमाणे पार पडली होती. भारताच्या त्या भूमिकेवर युक्रेनचे पंतप्रधान व्लादिमीर झेलेन्स्की यांनी परखडपणे टीका केली होती. ह्या सगळ्या घटनांची मोदींच्या सध्याच्या युक्रेन भेटीला पार्श्वभूमी आहे. दुर्दैवाने मोदी सध्या युक्रेनभेटीवर निघाले असतानाच युक्रेनने रशियावर मोठा द्रोनहल्ला नुकताच चढवला आहे. अर्थात, युक्रेन हा काही भारताचा शत्रू नाही. 1991 मध्ये जेव्हा युक्रेनला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा भारताने त्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आणि नंतरच्या काळात त्या देशाशी संरक्षणविषयक करारही झाले. जगभरातील नौदलांना लागणारी काही प्रमुख यंत्रसामुग्री ही युक्रेनमध्ये बनते. युक्रेनमधील आंतोनोव्ह किंवा झोर्या मॅशप्रॉक्तसारख्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील बड्या कंपन्या विविध देशांच्या नौदलांसाठी मरीन इंजिने किंवा टर्बाईनसारखी अजस्र यंत्रसामुग्री बनवतात. भारताचेही त्या कंपन्यांशी उत्पादनविषयक करार आहेत. त्या अंतर्गत एएन 32 बनावटीची मालवाहू विमाने काही युक्रेनमध्ये आणि काही त्यांच्या तंत्रज्ञांच्या देखरेखीखाली भारतात बनवली जातात. मध्यंतरी युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू करताच रशियाने ह्या दोन्ही कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पांवर बॉम्बहल्ले केले व तेथील उत्पादन बंद पाडले. त्याचा भारताशी असलेल्या त्यांच्या पुरवठा करारावरही परिणाम झाला. परंतु ह्या कंपन्यांना भारतात उत्पादन करू दिले गेले आहे. भारत फोर्जसारख्या आपल्या कंपनीने झोर्यासारख्या युक्रेनी कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक करून तिची मालकी मिळवलेली आहे. ह्या सगळ्यामुळे भारतासाठी युक्रेनशी मैत्रिपूर्ण संबंध महत्त्वाचे आहेत. अर्थात, एकीकडे रशियाला न दुखावता युक्रेनशी असलेले हे संबंध सांभाळणे म्हणजे भारतासाठी तारेवरची कसरतच आहे. परंतु कोणत्याही युद्धासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शी राहिलेली आहे. भारत हा मूलतः एक शांतताप्रेमी देश आहे. कोणताही प्रश्न युद्धाने सुटत नसतो, तर संवाद आणि चर्चेद्वारेच तो सोडवता येऊ शकतो ही भारताची आजवरची स्पष्ट भूमिका आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या ताज्या पोलंड व युक्रेन दौऱ्यातही तीच अधोरेखित केलेली आहे. ‘ही युद्धाची वेळ नव्हे, तर मानवजातीपुढे असलेल्या संकटांना सामोरे जाण्याची वेळ आहे’ असे मोदी म्हणाले आहेत. रशिया – युक्रेन युद्धात मध्यस्थीचा प्रयत्नही मध्यंतरी पंतप्रधान मोदींनी करून पाहिला होता, परंतु तो विफल ठरला होता. समरकंदमध्ये जेव्हा जी 7 राष्ट्रांची परिषद भरली होती, तेव्हा मोदी आणि झेलेन्स्कींच्या धावत्या भेटी झाल्या होत्या. त्यानंतर प्रथमच झेलेन्स्कींच्या निमंत्रणावरून मोदी युक्रेनमध्ये दाखल होत आहेत. आपल्या विश्वबंधू ह्या भूमिकेस अनुसरून ऑस्ट्रिया, पोलंड, युक्रेन अशा छोट्या छोट्या देशांशी देखील मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या भारताच्या नीतीला अनुसरूनच मोदींची ही युक्रेन भेट आहे. दोन्ही देशांदरम्यान संरक्षण व उद्योगविषयक नवे करार ह्या निमित्ताने होतील. मात्र, दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले रशिया – युक्रेन युद्ध अजून लांबतच चालले आहे. त्यामुळे अशा युद्धग्रस्त देशाशी भारताने पुढे केलेला मैत्रीचा हात रशियाला कितपत रुचेल हा प्रश्नच आहे. या युद्धा संदर्भात काही तडजोड, समेट घडवण्यात मोदींना यश येऊ शकेल हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.