पुढील 5 वर्षांत 70 उपग्रह प्रक्षेपित करण्याची इस्रोची योजना आहे. तसेच इस्रो चांद्रयान-3 च्या यशानंतर आता चांद्रयान 4 आणि 5 साठी तयारी करत असल्याचे इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी सांगितले. अंतराळ संस्थेने चंद्र मोहिमेच्या पुढील टप्प्यासाठी डिझाइन तयार केले आहे. त्यासाठी शासनाकडून मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. चांद्रयान-4 मोहिमेमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगनंतर चंद्राचे खडक आणि माती पृथ्वीवर आणणे, चंद्रावरून अंतराळ यान प्रक्षेपित करणे, चंद्राच्या कक्षेत स्पेस डॉकिंग प्रयोग करणे आणि नमुने पृथ्वीवर परत आणणे यांचा समावेश असल्याचे डॉ. सोमनाथ यांनी सांगितले.
डॉ. सोमनाथ यांनी, आपल्याकडे चंद्रावर जाण्यासाठी अनेक मोहिमा आहेत. चांद्रयान-3 चे काम पूर्ण झाले असलयाचे सांगून येत्या पाच वर्षांत 70 उपग्रह प्रक्षेपित करण्याची आमची योजना आहे. यामध्ये विविध मंत्रालये आणि सरकारच्या विभागांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लो अर्थ ऑर्बिट उपग्रहांचा समावेश आहे अशी माहिती दिली. डॉ. सोमनाथ यांनी, इस्रो पुढील 5 वर्षांत पृथ्वी निरीक्षण उपग्रहांची संपूर्ण मालिका प्रक्षेपित करण्याची योजना आखत असल्याचे सांगितले.