मत्स्योद्योग खात्याला केंद्राकडून मिळणार 147 कोटी

0
5

मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची माहिती; मत्स्यवाहिनी योजनेचा शुभारंभ

केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान मत्स्यसंपदा’ योजनेखाली गोवा सरकारच्या मत्स्योद्योग खात्याला 147 कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध होणार असून, तो निधी प्रामुख्याने मत्स्यव्यवसायासाठी आवश्यक साधनसुविधा उभारण्यावर खर्च करण्यात येणार असल्याची माहिती काल मत्स्योद्योगमंत्री नीळकंळ हळर्णकर यांनी दिली.
पणजीत काल मत्स्यवाहिनी योजनेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. त्यांनी ई-रिक्षाला झेंडा दाखवून योजनेचा शुभारंभ केला.
केंद्र सरकारकडून निधी मिळाल्यानंतर राज्यात काही नव्या मच्छिमारी जेटी उभारण्यात येणार असून, काही जुन्या जेटींची दुरुस्ती व सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती हळर्णकर यांनी दिली. समुद्रात तसेच नद्यांमध्ये काही ठिकाणी खडकाळ भाग असतो. या खडकाळ व अडगळीच्या अशा जागी राहणे मासळी पसंत करीत असते. अशा ठिकाणी मासळी घोळक्याने राहत असल्याने मासळीचे उत्पादन वाढते. समुद्रातील अशा खडकाळ व अडगळीच्या भागाला ‘रिफ’ असे म्हणतात. आता मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी समुद्रात असे कृत्रिम रिफ बसवण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, गोव्यातील समुद्रात पहिल्या टप्प्यात 14 रिफ बसवण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती हळर्णकर यांनी दिली.

मत्स्यवाहिनी सप्टेंबरअखेरीस प्रत्यक्षात कार्यरत
मत्स्यवाहिनी योजनेचा नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून काल शुभारंभ करण्यात आलेला असला तरी ही योजना खऱ्या अर्थाने सप्टेंबरअखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. मासळी विक्रीसाठी ई-रिक्षा भाडेपट्टीवर देण्यात येणार असून, या मासळी विक्रेत्यांना सरकारी एजंट स्वस्त दरात मासळी पुरवणार आहे. ई-रिक्षामध्ये एक ओपन टेरेससारखी जागा असेल व त्यात एक रेस्टॉरंट असेल, तेथे मत्स्य आहार शिजवून ग्राहकांना देण्यात येईल, तर ताजी मासळी गावागावांत विकण्यात येईल. मासळी ताजी राहावी यासाठी रिक्षात फ्रिजरही असेल, असे हळर्णकर यांनी सांगितले.