स्नेहवर्धनाचे प्रतीक रक्षाबंधन

0
9
  • मीना समुद्र

असे हे रक्षाबंधन म्हणजे एक स्नेहआश्वासन. जाती-धर्म-वंशभेदांच्या पार गेलेले. मंगलमय सुविचारांनी गुंफलेले हे अतूट स्नेहसूत्र. रक्षाबंधन म्हणजेच स्नेहसंवर्धन, प्रेममय आचरण आणि उच्च अशा मानवी मूल्यांची राखण! श्रावणी पौर्णिमेच्या, रक्षाबंधनदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!

आषाढ मास संपत आला तसे माणसाला श्रावणाचे वेध लागले. आषाढी अवसेला घराघरांतून दीपपूजा झाली आणि पाठोपाठ सृष्टीनेही घनांधकारात श्रावणाची ज्योत उजळली. गरजणारा, बरसणारा, धुवाधार कोसळणारा पाऊसही आता शांतावला. श्रावणासाठी पायी रुणझुण वाळे घालून आला. उसळणाऱ्या, घुसळणाऱ्या सागरलाटा मृदुलकरांनी वीणा छेडू लागल्या. कुण्या अदृश्य करांनी आकाशीच्या रत्नदीपावरची काजळी दूर केली आणि त्या हिरण्मय तेजाने आकाश झळाळू लागले. ते निळावले. चंदेरी-सोनेरी प्रकाश लेवून हसू लागले. ‘क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे’ अशा लपाछपीच्या खेळात श्रावण रंगला. इंद्रधनूच्या सप्तरंगी तोरणाखालून हासत, लाजत, नाचत, खेळत श्रावण आला तेव्हा लसलसत्या कोंबांची लवलव भूमीचे मार्दव सांगू लागली. अशा हरिततृणांच्या मखमाली गालिच्यावर पद रोवीत श्रावण आला. सोनेरी ऊन अंगाला माखून बसलेल्या वृक्षवल्लरींनी त्याला फुलांचे अर्घ्य दिले. तकतकीत पानांनी लपून मुजरा केला. टपटपणारा केशरी देठांचा शुभ्र प्राजक्त, रानी दरवळणारा पिवळाधम्म केवडा, घमघमणाऱ्या जाईजुई, इवल्याशा बकुळफुलांनी सुगंध उधळला. इंद्रधनुष्याचे मंगल तोरण आकाशी बांधले गेले. मला तरी नेहमी वाटते की धरणीने आकाशाच्या हातावर बांधलेली ही राखीच आहे.

श्रावणाच्या आगमनाने नाना तऱ्हेची जीवसृष्टी नादावली तिथे माणसाचे काय? पावसाच्या कहरापुढे हात टेकलेली आणि घनदाट काळोखाने ग्रासलेली माणसांची मने या हिरवाईने, सृष्टीच्या या साऱ्या हास्याने-लास्याने उल्हसित झाली आणि सृष्टिकर्त्याविषयीच्या कृतज्ञतेच्या भावनेने भरून गेली. भावभक्तीने भारावून गेली. नव्याच कोवळिकेने आणि संवेदनेने स्त्रियांनी तर श्रावणाला आपला सखा मानले. त्याची महती अनेक कवींनी गायिली. लेखकांची लेखणी तर त्याचे वर्णन करताना अजून थकली नाही!
यंदाही श्रावण आला तो पवित्र अशा सोमवारी. शिवमंदिराचे गाभारे वेदमंत्रघोषांनी गजबजून गेले. अभिषेक झाले. नववधूंनी शिवामुठी वाहिल्या. डोळे मिटून, हात जोडून ‘सर्व नातेसंबंधांचा गोडवा टिकून राहू दे’ म्हणून प्रार्थना केल्या. मंगळवारी पतीसाठी मंगळागौरी व्रत केले, देवीपूजा केली आणि झिम्मा, फुगड्या, किस्‌‍ बाई किस्‌‍ दोडका किस्‌‍, कुरतन मिरची जाशील कैशी, आगोटा-पाटोगा, पिंगा अशा नाना तऱ्हेच्या मुक्त, सर्वांगसुंदर खेळांनी रात्री दणाणून सोडल्या. बुधवारी आणि गुरुवारी अन्नदान करून ब्राह्मणांना संतुष्ट करणाऱ्या सुनेची गतवैभव प्राप्त करून देणारी कहाणी वाचली. शुक्रवारी जिवतीपूजा आणि सवाष्ण-भोजन, तसेच मुलाबाळांची पुरणाच्या दिव्यांनी आरती करून त्यांचे अभीष्टचिंतन केले गेले. नागपंचमीच्या सणाला माहेरवाशिणी सख्यांसह कुठे वारुळाला गेल्या, तर कुणी घरीच नागदेवतेची चंदनाकृती काढून किंवा मातीची प्रतिमा ठेवून पूजा-प्रार्थना केली. शनिवारी श्रीहनुमानाची आणि शनिदेवाची पूजा झाली. रविवारी आयतार पुजले आणि सूर्यदेवाची आराधना झाली.

नागपंचमीपासून चातुर्मासातील सणांना शुभारंभ होतो आणि देवदिवाळीपर्यंत ही गजबज चालूच असते. नागपंचमीचा दुसरा दिवस म्हणजे श्रावण शुक्ल षष्ठी. हा आम्हां वास्कोकरांचा आणि समस्त गोमंतकीयांचा अतिशय आवडता दिवस. या दिवशी यंदा दामोदर मंदिराच्या स्थापनेचा आणि भजनी सप्ताहाचा 125 वा वर्धापनदिन असल्यामुळे विशेष कार्यक्रमांनी साजरा केला गेला. दिंड्या, पार यांनी गजबजून गेला. श्रावण हाच मुळी माणसाच्या मनात उचंबळून आलेल्या भावभावनांचा असतो. यातला प्रत्येक दिवस हा वैशिष्ट्यपूर्ण आणि पवित्र. त्यामुळे घरीदारी आणि मंदिरी पूजा, जपजाप्य, वाणवसे, अभिषेक, भजनकीर्तन, दानदक्षिणा, कथा-कहाण्यांचे वाचन, नेमव्रत या सर्वांनी वातावरण अतिशय मंगलमय असते. श्रावणभर या सर्वांची आवर्तने होत राहतात. ईश्वरचरणी कृतज्ञतेच्या ओंजळी वाहिल्या जातात, अर्पण केल्या जातात.

श्रावण हा अतिशय महत्त्वाचा महिना ठरतो तो केवळ या पूजापाठामुळे नाही, तर तो माणसाला पवित्र आचरण करायला लावतो, संयम शिकवतो आणि सर्वांचे नातेसंबंधही हळुवारपणे जपतो. त्यांचे रेशीमबंध दृढ, दृढतर करणारा श्रावणमास म्हणून साऱ्यांच्या मनीमानसी वसतो. श्रावणात माहेरवाशिणी हक्काने माहेरी येतात आणि मुक्त मनाने खेळतात, नाचतात, गातात. सासरी काही जाच-काच असतील तर आप्तेष्टांबरोबर बसून बोलून त्यांची सोडवणूक करतात. आणि सारेच व्यवस्थित, छान असेल तर कौतुक, स्नेह, प्रेम या मनाच्या परड्या भरून घेतात. माता-पिता, भाऊ-बहिणी, सख्या-सोबत्यांबरोबर सारे क्षण घालवतात. निर्भर आनंदाने झुल्यावर झुलतात. गाणी गातात. सुखाचे क्षण अनुभवतात. नागपंचमीच्या कथेत एका अनाथ सुनेला माहेरी नेण्यासाठी एक नाग तिचा मामा बनून येतो आणि तिला आपल्या वारुळात घेऊन जातो. तिथे नागिणीला पिल्ले होतात. ती वळवळ करीत असल्याने, तिच्या हातून पडलेल्या दिव्याने त्यांची शेपटे भाजतात तेव्हा नाग तिला तिच्या घरी सोडून येतो. पुढच्या नागपंचमीला ती त्या सापांच्या पिल्लांसाठी त्यांची चित्ररूप पूजा करून ‘जिथे माझे भाऊ लांडोबा-पुंडोबा असतील तिथे ते सुखात असू देत’ अशी प्रार्थना करते, त्यावेळी तिचा सूड घेण्यासाठी आलेले ते भाऊ तिला आशीर्वाद देतात. प्राणिसृष्टी आणि मनुष्यसृष्टी यांच्यातील परस्पर भावबंध किती हळुवारपणे या कथेत उलगडले आहेत!
श्रावणी शुक्रवारच्या कहाणीत एक गरीब बहीण आपल्या अबोल कृतीने भावाच्या श्रीमंतीची मिजास उतरवते आणि आपला स्वाभिमानही जपते. सोमवारच्या खुलभर दुधाच्या कहाणीतील म्हातारी आजी ‘भाव तेथे देव’ हे सांगताना मुलामाणसांची, पशुपक्ष्यांची काळजी म्हणजे देवपूजा हे एका राजालाही निर्भयपणे सांगते. श्रावणात त्या वारांच्या अशा कहाण्या ऐकत, गोडधोड खात, पूजापाठ करता करता चंदनगंधाचे हे दिवस कसे भराभर उलटत राहतात आणि श्रावणी पौर्णिमा आता अगदी उद्यावर येऊन ठेपते. श्रावणी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा. या दिवसांत या कल्पवृक्षाचे हे श्रीफळ मुबलक प्रमाणात मिळते. घरोघर ही पौर्णिमा साजरी होत असली तरी किनारी भागात हिचे महत्त्व जास्त. विशेषतः कोळी जमातीचे मच्छीमार लोक अतिशय जल्लोषात हा सण साजरा करतात. कारण त्यांचे सारे जीवनच सागराच्या पाण्यावर अवलंबून! पावसाचा देव वरुण. त्याने पाऊसपाणी दिल्याबद्दल त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याला श्रीफळ अर्पण करतात. पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा माशांच्या प्रजननाचा असल्याने पावसाळ्यात मासेमारी बंद असते. या काळात समुद्राला उधाण येते. तुफान-वाऱ्यामुळे उंच उंच लाटा उसळत असतात. त्यामुळे पाण्यात होड्या घालत नाहीत. पण श्रावणी पौर्णिमेला पावसाचा जोर कमी झाल्यामुळे आपल्या उपजीविकेचे साधन हाती घेताना सागराची प्रार्थना करण्यासाठी सारा कोळीवाडा पारंपरिक वस्त्रे नेसून, अलंकार घालून नाचत-गात सागरकिनारी लोटतो.

ढोल-ताशा-सनई वाजवत मिरवणुका काढतात-
सण आयलाय गो आयलाय नारळी पुनवचा
मनी आनंद मावणा कोळ्यांचे दुनियेचा
किंवा ‘डोल डोलतंय वाऱ्यावरी…’ अशी गाणी गात, आनंदाने नाचत हा दिवस साजरा करतात. नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळाची बर्फी असे नारळापासून होणारे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. सागरमार्गाने जाणारे जहाजावरील दर्यावर्दी किंवा व्यापारउदिमासाठी जलमार्गाचा अवलंब करणारे व्यापारीही निर्विघ्नतेने प्रवास व्हावा म्हणून सागराची प्रार्थना करून त्याला सोन्याचा नारळ अर्पण करतात.

ही श्रावणी किंवा नारळी पौर्णिमा आणखी एका नावाने भारतीय संस्कृतीत झळाळत राहिली आहे ते नाव म्हणजे ‘राखी पौर्णिमा.’ उत्तर भारतात हिला ‘कजरी पौर्णिमा’ असेही संबोधन आहे. पण ‘राखी पौर्णिमा’ या नावाने ती सर्वत्र जास्त प्रचलित आहे. कारण तिचा संबंध ‘राखी’शी आहे. राखी पौर्णिमेला रक्षाबंधन केले जाते. राखी म्हणजे एक सूत्र किंवा रेशमी धागा, आणि राखणे म्हणजे रक्षण करणे. बहीण भावाच्या हातावर (मनगटावर) राखी बांधते आणि भावाकडून कुठल्याही वाईट परिस्थितीत आपले रक्षण व्हावे अशी अपेक्षा करते. ज्याच्या मनगटाला हा रेशीमधागा बांधला जाईल त्याच्यावर तिच्या रक्षणाची, सांभाळ करण्याची फार मोठी जबाबदारी असते. अशा अर्थाने ते ‘रक्षा-बंधन’ असले तरी ते एक स्नेहबंधन, प्रेमबंधन असते आणि सहोदरांचे अतूट रेशीमबंधन असते. त्यामुळे ते अतिशय विश्वासाचे, अतिशय आदराचे आणि अतिशय आपुलकीचे, जिव्हाळ्याचे प्रतीक असते. हा रेशीमधागा रक्षणाचे अभय देतो. मध्ययुगीन काळात भारतावर परकीयांची अनेक आक्रमणे झाली. तेव्हा स्त्रियांना अबला मानून त्यांच्यावर परकीयांकडून अन्याय, अत्याचार झाले. त्यांच्या शीलरक्षणाची आणि एकूणच त्यांची जबाबदारी पुरुषांनी उचलावी. धाडस आणि शौर्य त्यांच्या अंगी जागे व्हावे यासाठी या प्रथेचा प्रारंभ झाला असावा. चितोडगडची राणी कर्मावती हिने बहादूरशहापासून आपले रक्षण व्हावे म्हणून हुमायूनला राखी भेट म्हणून पाठविली आणि हुमायूनने प्राणपणाने तिचे रक्षण केले, अशी इतिहासातली कथा आहे. पण फार पुरातन काळापासून याचे धागेदोरे मिळतात.

फार पूर्वी देवदानव युद्धे होत. अशाच वृत्तासुराबरोबरच्या युद्धात इंद्राला विजय मिळावा म्हणून इंद्राणीने (शची) विष्णूकडून मिळालेला धागा इंद्राच्या हातावर बांधला. तेव्हापासून रेशीमबंधनाची प्रथा पडली असावी, ज्यामुळे बांधणाऱ्या माणसाचे प्रेम वाढावे आणि ज्याच्या हातावर बांधला जाईल त्याचा आत्मविश्वास जागृत व्हावा ही इच्छा फलद्रूप होत असावी. अंगभूत सामर्थ्याचे जागरण आणि त्यासाठी उत्तेजन- तेही आप्त व्यक्तीने प्रेमाने दिलेले- ही भावनाही त्यामागे असावी. अशीच रक्षाबंधनाच्या प्रारंभाची कहाणी सांगणारी आणखी एक कथा. पूर्वी बळी राजाने अश्वमेध यज्ञ केला. त्याने सर्वत्र सत्ता गाजवायला सुरुवात केली. तेव्हा श्रीविष्णूने वामनावतार धारण करून त्याच्याकडे तीन पावले जमिनीची याचना केली. वामनावतारी विष्णूने दोन पावलांत पृथ्वी आणि स्वर्ग व्यापले आणि तिसरे पाऊल बळीच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या डोक्यावर ठेवले तेव्हा बळी पाताळात गेला. त्याच्या औदार्याने प्रसन्न होऊन विष्णूने पाताळाचे राज्य त्याला बहाल केले आणि बळीने विष्णू आपल्या डोळ्यांसमोर राहावेत असा वर मागितल्याने तेही बळीसोबत पाताळनिवासी झाले. तेव्हा लक्ष्मीने बळीची बहीण बनून, बळीला भाऊ मानून, त्याला रेशीमधागा बांधून विष्णूला वैकुंठात पाठविण्याची विनंती केली. बळीने ती मान्य केली. रक्षाबंधनाची ही किमया!
कृष्णाच्या बोटाला झालेली जखम द्रौपदीने आपल्या शालूच्या पदराची चिंधी बांधून केलेल्या या रक्षाबंधनाला, या स्नेहवर्धनाला स्मरून कौरव-पांडव सभेत द्रौपदीवस्त्रहरण समयी तिचे शीलरक्षण करण्यासाठी कृष्णाने तिला वस्त्रे पुरविली.

रक्षाबंधनाच्या अशा अनेक कहाण्यांनी, पुराण आणि ऐतिहासिक कथांनी नातेसंबंधांचे जीवनातील महत्त्व आपल्या मनावर बिंबवले आणि रक्षाबंधन करून भारतीय संस्कृतीत हा स्नेहसंस्कार रुजवला, फुलविला. आज राख्यांनी सजलेली दुकाने सर्वत्र दिसतात. कागद, मणी, धागे, चांदी, सोने वापरून स्वस्तिचिन्हे घातलेल्या लाल, केशरी धाग्यांच्या राख्या आपले लक्ष आकर्षून घेतात. राखी मोठी वा छोटी, जास्त वा कमी किमतीची, यापेक्षा ती बांधण्यामागची भावना महत्त्वाची! त्यामागचे प्रेम, स्नेह, विश्वास महत्त्वाचा! तो दृढ करण्याची इच्छा महत्त्वाची! हे बंधन जरूर असते पण ते प्रेमाचे, स्नेहाचे!
अनेकदा व्यवहारवादी बनून आपण आपले मूलबंध विसरतो, विसरू पाहतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात कधी भेटीगाठीही दुर्मीळ होतात. स्त्रियांचे संवेदनशील मन माहेराशी, आप्तेष्टांशी जोडलेले असते, त्यांच्या आठवणीत रमणारे असते. अशावेळी आपल्या भाऊरायाला आपल्या घरी बोलावून ती त्याला पाटावर बसवते. पाटाभोवती रांगोळी घालते. औक्षणाच्या तबकात तुपाचे निरांजन लावलेले असते. भावाच्या कपाळी कुंकवाचा मंगल तिलक लावून त्याला स्नेहाने ओवाळते. त्याच्यावर अक्षता उधळते आणि सोन्याच्या अंगठीसोबत सुपारीने त्याला ओवाळते. सोन्यासारखा भाऊ सुपारीसारखा टणक, ठणठणीत प्रकृतीने सदैव आपल्या पाठीशी राहू दे म्हणून त्याच्या मनगटावर राखी बांधते. ती स्वतः मोठी असेल तर कौतुकाने लहान भावाला राखी बांधून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. भाऊ नसेल तर आई-मुलगी, बहिणी-बहिणी, मैत्रिणी एकमेकींना राखी बांधतात.

हा मुख्यतः बहीण-भावाच्या नात्याचा उत्सव असला तरी त्याने घरच्या सर्वांची मने आनंदित होतात. लेकीबाबत मातापिता निश्चिंत होतात. काही ठिकाणी पत्नी पतीला किंवा मानलेल्या भावालाही राखी बांधते. शालेय जीवनात सैनिकांसाठी राखी बनवून पाठविण्याचे संस्कार मुलांवर केले जातात. ते तर देशरक्षणासाठी सज्जच असतात. असे हे रक्षाबंधन म्हणजे एक स्नेहआश्वासन. जाती-धर्म-वंशभेदांच्या पार गेलेले. मंगलमय सुविचारांनी गुंफलेले हे अतूट स्नेहसूत्र. रक्षाबंधन म्हणजेच स्नेहसंवर्धन, प्रेममय आचरण आणि उच्च अशा मानवी मूल्यांची राखण! श्रावणी पौर्णिमेच्या, रक्षाबंधनदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!