दूधसागर धबधब्यावर ट्रेकिंगसाठी लागू केलेले शुल्क रद्द केल्याशिवाय पर्यटकांना सेवा न देण्याचा निर्णय कुळे येथील गाईड्सनी घेतला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटकांना माघारी जावे लागले. स्थानिक पंचायत, पोलीस, वन खाते तसेच स्थानिक आमदाराने बैठक बोलवून चर्चा करण्याची मागणी गाईड्सनी केली आहे.
दूधसागर धबधब्यावर ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) शुक्रवारपासून अचानक 177 रुपये शुल्क घेण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे बुधवारपासून वन खात्याने सध्याच्या 100 प्रवेश शुल्कात आणखी 50 रुपयांची वाढ केली. धबधब्याजवळ गोवा पर्यटन विकास महामंडळाने कोणतीच सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे अचानक पर्यटकांना लागू केलेले दर रद्द करण्याची मागणी गाईड्सनी केली आहे.
रविवारी कुळे परिसरातील गाईड्सनी वन खात्याच्या गेटजवळ बैठक घेतली. जोपर्यंत वन खात्याने वाढ केलेले 50 रुपये व जीटीडीसीने लागू केलेले 177 रुपये नवीन शुल्क रद्द होत नाही, तोपर्यंत गाईड्स पर्यटकांना घेऊन ट्रेकिंगवर जाणार नसल्याचा निर्णय त्यांनी घेतला.