राज्य सरकारच्या 7 खात्यासंबंधी नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ‘सीएम हेल्पलाईन’चा शुभारंभ काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. पोलीस, वीज, जलस्रोत, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाज कल्याण आणि सार्वजनिक बांधकाम या सात खात्यातील तक्रारी सीएम हेल्पलाईनवर स्वीकारल्या जाणार आहेत. सीएम- हेल्पलाईनचा क्रमांक 9319828581 असा आहे. सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 यावेळेत नागरिकांच्या तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. तसेच, तक्रारदाराला 72 तासांत तक्रारीच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सीएम हेल्पलाईनवर येणाऱ्या तक्रारी सोडविण्यासाठी सातही खात्यांमध्ये नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. तसेच, तालुका पातळीवर खास अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दोन महिन्यांनी या उपक्रमाचा आढावा घेतला जाणार आहे. पोलीस, वीज खात्याच्या पूर्वीच्या हेल्पलाईन कायम राहणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारकडून सरकार तुमच्या दारी, हॅलो गोंयकार आदी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या जातात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.