- श्री. अनुप प्रियोळकर
ज्येष्ठ साहित्यिक श्री. जयवंत द्वारकानाथ दळवी यांचे 14 ऑगस्ट 2024 पासून जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. एका प्रतिभावंत व्यक्तीचा लाभलेला सहवास, त्या सहवासाचे कौटुंबिक जिव्हाळ्यात झालेले रूपांतर, याविषयी सांगताहेत श्री. अनुप प्रियोळकर.
ज्येष्ठ नाटककार, कादंबरीकार, वृत्तपत्रलेखक, साहित्यिक श्री. जयवंत द्वारकानाथ दळवी यांचे 14 ऑगस्ट 2024 पासून जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. एका प्रतिभावंत व्यक्तीचा लाभलेला सहवास, त्या सहवासाचं कौटुंबिक जिव्हाळ्यात झालेलं रूपांतर, या प्रवासावर मी माझ्या परीने थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही आदराने त्यांना ‘बाबा’ म्हणून हाक मारायचो. पण आरवलीत ते सर्वांचे ‘जयाभाई’ होते.
हडफडे, गोवा येथील केंकरे घराणे हे जयाभाईंचे आजोळ. त्यांना या विश्वातील पहिले सूर्यदर्शन घडले ते हडफडे गावी म्हणजेच गोमंतकात. अर्थात, त्यांचा जन्म गोव्यात झाला याचा उल्लेख होणे तितकेच महत्त्वाचे. आपल्या लेखणीने आणि सूक्ष्म निरीक्षणाने त्यांनी नाटक, कथा व कादंबरीच्या माध्यमातून माणसाच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळले. ‘भाऊराव अलाणे व बापूराव फलाणे’ या टोपण नावाने गुदगुल्या करणारे आणि मनाला टवटवी आणणारे सकस लेखन त्यांनी केले आणि यातूनच ‘जयवंत दळवी’ हे नाव मराठी प्रांतात सर्वोमुखी झाले.
‘पुरुष’ नाटकातून आपल्या हाती सत्ता असल्यावर, त्या सत्तेचा दुरुपयोग करून कसा फायदा घेतला जातो, स्त्रियांवर कसे अन्याय-अत्याचार केले जातात हे दाखवले आहे, तर ‘संध्याछाया’ नाटकाद्वारे वृद्धापकाळात येणारे एकाकीपण, ‘नातीगोती’ या नाटकातून एखाद्या कुटुंबातील मानसिक विकलांग व्यक्तीमुळे उद्भवणाऱ्या अनेक समस्या असे विविध विषय त्यांनी समाजासमोर धाडसीपणाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व प्रश्नांची दाहकता आजच्या घडीलाही तेवढीच तीव्र असून, अनेकांना त्यातून जावे लागतेय हे वास्तव नाकारून चालणार नाही.
दळवींचे कुलदैवत श्री मंगेश. आम्ही त्यावेळच्या आमच्या परिस्थितीनुसार मंगेश देवालयाच्या परिसरात राहत होतो. त्यातूनच जयवंतरावांशी आमचा परिचय झाला. दळवींना लेखनासाठी निवांत व एकांत हवा असायचा, तो त्यांना निसर्गसंपन्न अशा मंगेशी गावात मिळत असे. त्यातून त्यांच्या कुटुंबीयांशी जुळलेले स्नेहबंध आणि त्याअनुषंगाने असलेल्या काही आठवणी त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने शब्दबद्ध करण्याचा हा माझा केविलवाणा प्रयत्न.
मंगेशरावांना मी प्रथम पाहिले व भेटलो ते साल होते 1980. त्यावेळी माझे वय 18 वर्षे. मला आठवते, ही भेट मंगेश देवस्थानाच्या प्रकारात घडून आली. त्यावेळी ते प्रतिभावंत लेखक व साहित्यिक आहेत व त्यांनी नाटक व कादंबऱ्या लिहिल्या आहेत, हे माझ्या गावीही नव्हते. त्यावेळी माझे महाविद्यालयीन शिक्षण चालू होते व मराठी साहित्य वाचनाचा एवढा मोठा पल्ला मी गाठला नव्हता. मला त्यांच्या या पैलूचा परिचय व्हायला पुढे दहाबारा वर्षांचा काळ गेला.
दळवी साहेबांच्या डोक्यात एखाद्या कथेचा विषय घोंगावू लागला की ते माझ्या वडीलबंधूना मंगेशी देवालयाच्या परिसरातील एखादी खोली आरक्षित करण्यासाठी पत्र पाठवीत. त्यांचा मुक्काम किमान पंधरा दिवसांचा असायचा. त्या पत्रात एक सौम्य स्वरूपात सूचनावजा तंबी पण असायची- ‘मी येणार असल्याचे कोणासही कळू देऊ नका, म्हणजे लिखाणात व्यत्यय येणार नाही.’ त्यांच्याबरोबर सौ. दळवी यांचेही आगमन व्हायचे. दळवींच्या उलट त्यांची पत्नी. त्यांची देवावर असीम श्रद्धा. दिवसभराचं लिखाण संपल्यावर संध्याकाळी ते पाय मोकळे करण्यासाठी म्हार्दोळपर्यंत चालत जात. संपूर्ण चालण्यात त्यांचे बारीक निरीक्षण असे. पण बोलणे फक्त दोन ते तीन वाक्ये. लिखाण संपले की दळवी कुटुंब पुन्हा मुंबईला रवाना होत असे. दळवींचे मंगेशीला येणे म्हणजे केवळ लिखाणासाठी लागणारा निवांतपणा. यापलीकडे आपले कुलदैवत श्री मंगेश म्हणजे देवावर विश्वास, श्रद्धा याचा काहीही संबंध नसायचा. सौ. उमा वहिनींनी मुंबईत सोळा सोमवारच्या व्रताचा संकल्प करून ते प्रत्यक्षात आणले. त्याचे उद्यापन व श्रेय प्राप्त करण्यासाठी उभयता मंगेशीला लिखाणाव्यतिरिक्त आल्याचे प्रथमच आम्ही अनुभवले. व्रताच्या उद्यापनाच्या निमित्ताने वहिनींसोबत श्री. दळवी सोवळं नेसून, पूजेच्या साहित्याचं ताट हातात घेऊन चालताना मी पाहिले. त्यानंतर काही वर्षांनी बोरिवली येथे त्यांच्या घरी भेटीला गेलो होतो. सहज गप्पागोष्टी चालू असताना त्यांच्या नास्तिकतेचा धागा पकडून त्यांच्या या विरोधाभासावर मी त्यांना बोलते केले. त्या प्रश्नावर त्यांचे उत्तर मार्मिक व विचारपूर्वक होते. ते म्हणाले, ‘मी सोवळं नेसून, हातात पूजा साहित्याचे ताट घेऊन जाणे म्हणजे माझा देवावर विश्वास व श्रद्धा आहे असा याचा अर्थ मुळीच होत नाही. व्रत माझ्या बायकोने केले. मी जर सोवळं नेसून तिच्याबरोबर राहिलो आणि त्या व्रताच्या सांगतेचा आनंद व समाधान बायकोला मिळत असेल, तर तिला तो आनंद मी का मिळवून देऊ नये?’ या त्यांच्या उत्तरात त्यांचा कुटुंबवत्सलपणा दिसून येतो.
जशी वर्षे गेली तसा आपलेपणा वाढत गेला. दोन्ही कुटुंबांत स्नेह व आपुलकी वाढत गेली आणि आमचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. त्यांना आम्ही राहत असलेल्या जागेसंबंधी थोडीशी कल्पना होती. एके दिवशी उभयतांनी आमच्या घरी सहज भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही देवालयाच्या डाव्या बाजूला भाड्याच्या दोन खोल्यांत राहत होतो. परिस्थिती फार बेताची होती. बसण्यासाठी एक लाकडी बैठक सोडल्यास बाकी साधन नव्हते. आम्हाला अशी मोठी असामी आमच्या घरी येतेय म्हणून संकोचही वाटला. परंतु त्यांनीच तशी इच्छा व्यक्त केल्याने आमचा नाईलाज झाला.
ठरल्याप्रमाणे ती दोघे आमच्या घरी आली. प्रथमदर्शनीच त्यांना आमच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना आली. त्यांची नजर सर्वकाही बोलून गेली. आमची आई, वडीलबंधू व बहिणीशी संवाद साधल्यावर चहा घेऊन निघताना त्यांचा सुन्न चेहरा माझ्या नजरेस पडला. ते वर्ष होते 1982. गोव्यातून मुंबईला पोहोचल्यावर त्यांनी त्यांचे परममित्र दैनिक ‘गोमन्तक’चे संपादक श्री. नारायण आठवलेंना पत्र लिहून आमच्या परिस्थितीची कल्पना दिली व आमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला गोव्यातील कोणत्याही आस्थापनात नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. त्यांचे ते पत्र श्री. नारायण आठवलेंना आदेश होता. आठवले साहेबांनी ‘लोकविश्वास प्रतिष्ठान’ ही श्रवणबाधित मुलांसाठी संस्था सुरू केली होती. त्या कार्यालयातील कारकून म्हणून कामाला असलेल्या मुलीने नोकरी सोडल्याने त्यांनी आमच्या घरी त्यांचे पत्र घेऊन ‘गोमन्तक’चा माणूस पाठवला आणि माझ्या बहिणीला महिना रु. 400 या पगारावर नोकरीस रूजू करून घेतले. येथूनच आमच्या घरात उजेडाचा किरण आला. याचं श्रेय दळवी साहेबांनाच द्यावे लागेल. आठवले साहेबांनी त्यांना ही बातमी कळवली. त्यातून आम्हाला जेवढा आनंद मिळाला त्यापेक्षा कितीतरी पटीने दळवी साहेबांना आनंद झाला व समाधान वाटल्याचे जाणवले. पुढील काही वर्षांत परिस्थितीत झालेल्या बदलाला अनुसरून मी थोडे धाडस करून फोंड्यात एक सदनिका आरक्षित केली. दळवी साहेब लेखनासाठी मंगेशीला येत असल्याने जुलै 1990 मध्ये दळवी साहेबांचे आगमन झाले होते. लिखाण संपवून निघायच्या दोन दिवस आधी मी त्यांना फोंड्यात सदनिका आरक्षित केल्याची बातमी दिली. त्यांना फार आनंद झाला. त्यांनी सदनिकेला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच संध्याकाळी मंगेशीहून भाड्याची गाडी घेऊन दळवी दाम्पत्य, मी व माझा मोठा भाऊ अरुण त्यांना सदनिका दाखवण्यासाठी घेऊन आलो. त्यांनी ती जागा बघितली व मला म्हणाले, ‘पुढच्या वेळेस येईन तेव्हा दोन दिवस इथेच मुक्काम करीन.’ त्यावेळचा त्यांचा तो प्रफुल्लित चेहरा मला अजूनही आठवतो.
गोव्याला परत येण्याचे आश्वासन देऊन मुंबईस गेलेले दळवी मूत्रपिंडाच्या आजारामुळे परत गोव्यात पोहोचू शकले नाहीत. डायलेसिसची व्यवस्था फोंडा शहरात नसल्याने इच्छा असूनही त्यांना पुन्हा आमच्या घरी येता आले नाही. एका अर्थाने ते आमचेही स्वप्न भंग पावले. 1990 ते 1993 पर्यंत मी त्यांच्या बोरिवली येथील निवासस्थानी जाऊन भेटून येत असे.
दळवी साहेबांबद्दल लिहायचे झाले तर त्याचा परिघ फार मोठा आहे. अगदी सुरुवातीस कोकणातील त्यांचे दिवस, त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांचे मुंबईत स्थलांतर झाल्यानंतर त्यांनी अनुभवलेले जीवन फार कष्टमय होते. त्यामुळे सर्वसामान्य माणसाबद्दल त्यांच्या मनात कायम आत्मीयता राहिली. अन् याचा प्रत्यय अनेकांना आला असेल. देवावर जरी त्यांची श्रद्धा नव्हती तरी आरवलीच्या वेतोबावर त्यांची फार श्रद्धा. वेतोबा हा घराण्यातील कर्त्या पुरुषासारखा. तोच सर्वांचे रक्षण करतो यावर त्यांचा फार विश्वास. दळवींच्या लग्नाआधी त्यांची पत्नी नोकरी करीत होती. लग्न झाल्यावर स्वतःच्या नोकरीतून व लिखाणाच्या मिळकतीतून आपली आर्थिक बाजू समाधानकारक झाल्यावरच त्यांनी पत्नीस नोकरीचा राजीनामा द्यायला लावला. यामागील हेतू एकच की, गरज असलेल्या माणसास ती जागा मिळावी व त्याचा संसार सुखाचा व्हावा! पुढे काही वर्षांनी त्यांना त्यांच्या लिखाणातून अधिक सुबत्ता आल्यावर व आर्थिक बाजू मजबूत झाल्यावर नऊ वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असताना त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यावेळीही तोच विचार होता. दळवी अमेरिकेच्या माहिती खात्यात इंग्रजी पुस्तकांचे मराठी रूपांतर करण्याच्या विभागात प्रमुखपदी होते. त्यावेळी त्यांनी अत्यंत गरज असलेल्या अनेक हातांना भाषांतरासाठी पुस्तके राखून ठेवून त्यांच्या संसाराला हातभार लावला, हा त्यांचा स्वभाव व ध्यास त्यांच्या दर्जेदार लेखनापेक्षाही कितीतरी पटीने अधिक समृद्ध व प्रेरणादायी होता. पण त्यांनी केलेल्या मदतीची उजव्या हाताची चाहूल डाव्या हाताला न लागत नव्हती व उजव्या कानाची बातमी डाव्या कानाला कळू कळत नव्हती. अत्यंत साधेपणाने व कुटुंबवत्सल असे आयुष्य ते अखेरपर्यंत जगले. आता त्यांच्या पुतण्याचा मुलगा श्री. वेद सचिन दळवी हा काकांचा लिखाणाचा वारसा पुढे चालवत आहे, ही खरोखर आनंददायी गोष्ट आहे.
जुलै 1990 ची मंगेशीला लिखाणाच्या निमित्ताने दिलेली भेट ही त्यांची शेवटची ठरली. माझे मित्र ज्यांनी आपल्या मिळकतीचा अधिकांश भाग स्वाक्षरी व छायाचित्रांच्या छंदासाठी घालविला, त्या श्री. प्रकाश पवार यांना त्यांची स्वाक्षरी घेण्याची फार इच्छा होती. पण तो योग जुळून येत नव्हता. मी सहज पवारांना दळवी मंगेशीस आल्याची बातमी दिली व ते उद्या निघतील असेही कळवले. पवारांना फार आनंद झाला व दुसऱ्याच दिवशी सकाळी मंगेशीला त्यांची स्वाक्षरी व फोटो घेण्यासाठी ते हजर झाले. दळवी दाम्पत्य कुलदैवत मंगेशचा निरोप घेऊन जाण्याच्या तयारीत होते. (श्री मंगेशाच्या कुळाव्यान गोव्याबाहेर सीमा ओलांडून परत निघत असताना श्रींचा निरोप घेणे बंधनकारक असल्याने, तसेच सौभाग्यवतीच्या समाधानासाठी त्यांनी निरोप घेण्याची प्रथा शेवटपर्यंत पाळली होती.) देवालयाच्या बाहेर आल्यानंतर मी दळवी साहेबांना पवारांच्या या छंदाबद्दल सांगितले. त्यांनी काढलेले इतर अनेक मान्यवरांचे फोटो व स्वाक्षरी बघितल्या व लगेच उभयतांनी जवळच असलेल्या तुळशीवृंदावनाजवळ फोटो घेण्याची अनुमती दिली. पवारांनी दळवींच्या आदरयुक्त भीतीमुळे एकच फोटो घेतला व त्यांची कार्डावर स्वाक्षरी घेतली. दळवी साहेबांना निघण्याची घाई असल्यामुळे पुढच्या भेटीत निवांतपणे फोटो घेऊ असे त्यांनी आश्वासन दिले व ते विमानतळावर जाण्यास गाडीत बसले. मलाही त्यांनी याच भेटीत फोंड्यातील वास्तूत राहायला येण्याचे आश्वासन दिले होते. पण पुढे नियतीला काही वेगळाच खेळ खेळायचा होता असे आता राहून राहून वाटते.
मुंबईस गेल्यावर काही महिन्यांत त्यांना मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रासले व त्यांच्या आहारावर व प्रवासावर पूर्णपणे नियंत्रण आले. मासे व मासळीचे वेगवेगळे प्रकार हा दळवींचा फार आवडता विषय. त्यांनी त्यांच्या लिखाणात मासळीवरती व चांगल्या मासळीच्या खानावळींवर मनसोक्त लिहिलेले आहे व त्या सर्वांचा आस्वादसुद्धा घेतला आहे. दादरच्या मासळी मार्केटमध्ये त्यांना सर्व कोळिणी ‘घाऱ्या दादा’ म्हणून हाक मारीत (त्यांचे डोळे घारे असल्यामुळे) व त्यांच्यासाठी चांगले मासे आधीच बाजूला काढून ठेवीत. मी ज्यावेळी माझ्या इतर कामासाठी मुंबईला जायचो त्यावेळी आवर्जून त्यांच्या बोरिवली येथील निवास्थानाला भेट द्यायचो. डायलेसिसने होणाऱ्या वेदनांमुळे त्यांची मला एक सूचना असायची की मी आधी वेळ व दिवस ठरवून यावे, जेणेकरून भेटीचा आनंद अनुभवयला मिळेल. या विकाराने त्यांची प्रकृती थोडीफार नरम होत आहे असे जाणवत होते. वयानुसार शरीराने साथ देणे हळूहळू कमी केले होते.
14 ऑगस्ट 1994 रोजी त्यांनी वयाची सत्तरी पूर्ण केली. त्यानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराने महाराष्ट्रभूषण श्री. पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते बोरिवलीत त्यांचा भव्य सत्कार घडवून आणला. तो त्यांच्या जीवनातील एकमेव सत्कार सोहळा होता. हा सत्कार सोहळा 4 सप्टेंबरला पार पडला. त्यानंतर त्यांच्या जगण्यात व बोलण्यात निराशेचा सूर जाणवू लागला. बोलता बोलता ते सहज बोलून गेले की मृत्यूचे ढग जवळ दिसत आहेत. कोण जाणे, त्यांना या क्षणाची चाहूल आधीच लागली असावी. 16 सप्टेंबरच्या पहाटे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी पत्नीस हाक मारली व चहा करण्यास सांगितले. लगेच त्यांच्या नातेवाइकांना व डॉक्टरांनाही बोलविण्यात आले. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ऑक्सिजनचा मास्क लावण्यात आला. तोंडाला लावलेला मास्क मी स्वतः पकडतो असे सांगून त्यांनी डॉक्टरांना आपल्यापासून दूर केले. आपल्यापासून इतरांना कसलाही त्रास होऊ नये हा त्यामागील हेतू. सर्व प्रयत्न चालू असताना काही क्षणात त्यांचा हात निसटला व एका प्रतिभावंत साहित्यिकाने व नाटककाराने शेवटचा श्वास घेतला.
वयाची सत्तर वर्षे, एक महिना व दोन दिवसांचा आपला या भूतलावावरील प्रवास संपवून दळवी साहेब परत न येण्याच्या प्रवासाला निघून गेले. कुठल्याही देवाच्या भक्तीत अडकून न राहता इतरांना आपल्या कृतीने व प्रतिभासंपन्न लेखणीने आनंदी करणाऱ्या या हिमालयाच्या उंचीच्या माणसाची 14 ऑगस्ट 2024 पासून जन्मशताब्दी सुरू होत आहे. या वर्षाच्या निमित्ताने त्यांना कृतज्ञतेचा नमस्कार करावा या सद्हेतूने, त्यांचा मिळालेला प्रत्यक्ष सहवास व सुगंध मी माझ्या काळजात साठवून ठेवलेला आहे. दळवीसाहेबांच्या चरणी आमच्या कुटुंबाकडून कोटी कोटी प्रणाम!