काळी नदीवरील जुना पूल कोसळला

0
9

>> गोवा-कारवार वाहतुकीवर परिणाम; एक मालवाहू ट्रक नदीत कोसळला; चालकास वाचवले; अवजड वाहतूक धिम्या गतीने सुरू

मडगाव-कारवार मार्गावरील सदाशिवगड-कारवार येथील काळी नदीवरील जुना पूल मंगळवारी मध्यरात्री कोसळला. सदाशिवगडला कारवारच्या अन्य भागांशी जोडणारा हा महत्त्वाचा पूल असून, तो 41 वर्षे जुना होता. कोसळलेल्या पुलाचा अंदाज न आल्याने मध्यरात्री त्याचदरम्यान गोव्यातून कारवारच्या दिशेने जाणारा तामिळनाडू येथील एक ट्रक नदीत कोसळला. त्या ट्रकच्या चालकाला स्थानिक मच्छिमारांनी वाचवले. हा पूल कोसळल्याने दोन्ही बाजूला शेकडो वाहने, मालवाहू ट्रक आणि प्रवासी बसेस दुपारपर्यंत अडकून पडल्या होत्या. त्यानंतर दुपारी बाजूच्याच नव्या पुलावरून हलकी वाहने सोडण्यात आली. मात्र अवजड वाहने सायंकाळपर्यंत थांबवून ठेवण्यात आली होती. त्यानंतर रात्रीच्या सुमारास पोलिसांच्या देखरेखीखाली एक-एक करून अवजड वाहने नव्या पुलावरून सोडण्यात आली. जुना पूल कोसळल्याने त्याचा धक्का लागून नव्या पुलाला धोका पोहोचल्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारी तज्ज्ञांच्या पथकाकडून नव्या पुलाची सुस्थितीबाबत पाहणी केल्यानंतरच पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होणार आहे. दरम्यान, या प्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे.

कारवारच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री 1 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. त्यावेळी कामावर असलेले पोलीस कर्मचारी विनय काणकोणकर यांनी ही घटना प्रथम पाहिली आणि कारवारहून गोव्याच्या दिशेने जाणारी एकूण 6 वाहने सदाशिवगडच्या बाजूने थोपवून धरली, तोपर्यंत तामिळनाडू येथील एक मालवाहू ट्रक गोव्याहून कारवारच्या दिशेने जात असताना त्या पुलावरून खाली कोसळला. सदर चालकाचे नाव बाल मुरगन असून, त्याला स्थानिक मच्छिमारांनी सुखरुपपणे वाचवले. त्याच्यावर सध्या कारवारच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळतााा कर्नाटकचे मत्स्योद्योगमंत्री मक्कल वैद्य, कारवारच्या जिल्हाधिकारी लक्ष्मी प्रिया, पोलीस अधीक्षक एम. नारायण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सी. टी. जयराज, उपअधीक्षक श्री. गिरीश आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कदंबसह प्रवासी बसेसनाही फटका
मडगाव-कारवार मार्गावरील कदंब आणि कर्नाटक परिवहन मंडळाच्या सर्व प्रवासी बसेस काल सदाशिवगड येथे थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे कारवार आणि अन्य भागातून गोव्यात येणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि अन्य प्रवाशांची गैरसोय झाली.
आधी व्हायचा फेरीबोटीतून प्रवास – 41 वर्षांपूर्वी ज्यावेळी हा पूल उभारण्यात आला नव्हता, त्यावेळी मडगाव-सदाशिवगड अशी बस वाहतूक चालू होती. आणि त्यापुढे कारवारला जायचे झाल्यास फेरीबोटीतून काळी नदी पार करत जावे लागत असे.

विनय काणकोणकर यांचे प्रसंगावधान
ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचारी विनय काणकोणकर यांनी प्रसंगावधान राखून कारवारच्या पोलीस स्थानकात काळी नदीवरील पूल कोसळल्याची माहिती दिली. तसेच सहा मालवाहू वाहने सदाशिवगडच्या बाजूने अडवून ठेवली. एवढ्यावरच न थांबता जो ट्रक नदीपात्रात कोसळला होता, त्याच्या सुटकेसाठी मच्छिमार वसाहतीमध्ये संपर्क साधून बोट मागवून घेतली आणि नदीत पडलेल्या ट्रकचालकाला स्थानिक मच्छिमार बांधवांच्या मदतीने बाहरे काढले आणि नंतर त्याला इस्पितळात दाखल केले, अशी माहिती कारवारचे पोलीस अधीक्षक एम. नारायण यांनी दिली.

पुलाच्या तपासणीकडे दुर्लक्ष : मक्कल वैद्य
साधारणपणे 41 वर्षांपूर्वी 1982 साली या पुलाची उभारणी करण्यात आली होती. गेल्या काही वर्षांत या पुलावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे या पुलाची वारंवार तपासणी करायला हवी होती. त्याचे संरचनात्मक लेखापरीक्षण करायला हवे होते; मात्र पुलाचा कंत्राटदार आणि केंद्र सरकारने हयगय केली, असा आरोप कर्नाटकचे मत्स्योद्योगमंत्री मक्कल वैद्य यांनी घटनास्थळी पुलाच्या पाहणीनंतर काल केला.

नव्या पुलाची अवजड वाहतूक क्षमता तपासणार
जो दुसरा नवा पूल आहे, त्या पुलाची अवजड वाहने पेलण्याची क्षमता तपासण्यात येणार असून, त्यानंतरच अवजड वाहनांना या पुलावरून परवानगी दिली जाईल, असे मक्कल वैद्य यांनी स्पष्ट केले.

हलकी वाहतूक सुरू; अवजड वाहने धिम्या गतीने
काल पूल कोसळल्यानंतर दुपारपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक नव्या पुलावरून बंद केली होती. दुपारनंतर केवळ दुचाकी आणि अन्य हलक्या वाहनांना पुलावरून वाहतुकीस परवानगी देण्यात आली. दिवसभरात नव्या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. अवजड वाहतूक रोखण्यासाठी दोन्ही बाजूला पोलीस तैनात करण्यात आले होते. काही अवजड वाहने गोव्यातून अन्य मार्गे वळविण्यात आली, तर काही अवजड वाहने सदाशिवगड, व्हाया चिताकुला या मार्गे वळविण्यात आली. यानंतर रात्रीच्या सुमारास एक-एक अशा पद्धतीने अवजड वाहने नव्या पुलावरून सोडण्यात आली.