>> विरोधी आमदारांकडून विविध मुद्दे उपस्थित करत विधेयकाला आक्षेप
गोवा विधानसभेत सादर केलेल्या गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि एक खिडकी सुविधा (दुरुस्ती) विधेयक 2024 ला विरोधी पक्षांतील आमदारांनी विविध मुद्दे उपस्थित करून आक्षेप घेतल्याने अखेर सदर विधेयक सभागृह निवड समितीकडे पाठवण्याचा निर्णय काल घेण्यात आला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभ े त उद्योग खात्याचे गोवा गुंतवणूक दुरुस्ती विधेयक विचारार्थ सादर केले. त्याला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, आमदार विजय सरदेसाई, व्हेन्झी व्हिएगश यांनी विरोध दर्शवून विधेयकातील त्रुटी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे सदर विधेयक सभागृह निवड समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. सभागृह निवड समितीमध्ये उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, कार्लुस फेरेरा, विजय सरदेसाई, नीलेश काब्राल, वीरेश बोरकर, आलेक्स रेजिनाल्ड, गणेश गावकर आणि कृष्णा साळकर यांचा समावेश आहे.
अन्य काही विधेयके संमत
महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मांडलेले गोवा जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक 2024 चर्चेनंतर 29 विरुद्ध 7 मतांनी संमत करण्यात आले. याशिवाय गोवा सार्वजनिक समुद्रकिनाऱ्यावर शॅक्स उभारणे (नियमन आणि नियंत्रण) विधेयक, गोवा भाडेकरूंची पडताळणी विधेयक, गोवा लेजिस्लेटिव्ह डिप्लोमा क्र. 2070 (दुरुस्ती) विधेयक संमत करण्यात आले.
पावसाळी अधिवेशनाची सांगता
गोवा विधानसभेच्या 18 दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची काल सांगता झाली. त्यानंतर सभापती रमेश तवडकर यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केले. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला 15 जुलैला प्रारंभ झाला होता. या अधिवेशनात 2024-25 च्या अर्थसंकल्पावर तीन दिवस चर्चा करण्यात आली. त्यानंतर अनुदानित पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. या अधिवेशनात सुमारे 135 तास कामकाज झाले. सात सरकारी विधेयके विचारात घेऊन संमत करण्यात आली. आमदारांच्या तारांकित आणि अतारांकित प्रश्नांवरही चर्चा झाली, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली.