पर्वरी येथील नियोजित उड्डाणपुलाच्या कामासाठी पर्वरी येथे दोन ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग चार महिने बंद ठेवण्याचा निर्णय तूर्त स्थगित ठेवण्यात आला आहे. वाहतूक पोलीस पर्यायी मार्गाने पर्वरीतील वाहतूक वळविण्याबाबत या आठवड्यात चाचणी घेणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
पर्वरी येथील महामार्गावर उड्डाणपुलाच्या कामासाठी मुख्य महामार्ग बंद ठेवला जाणार असून, त्याबाबतची एक सूचना सोमवारी जारी करण्यात आल्याने या मार्गावरून नियमित वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. पर्वरी येथील अंतर्गत भागातून महामार्गावरील वाहतूक वळविली जाणार असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. अंतर्गत भागातून वाहतुकीची चाचणी न घेता पूर्ण वाहतूक वळवली, तर मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतर्गत पर्यायी मार्गावरून वाहतुकीची चाचणी घेण्याची निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर संबंधितांची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.