स्तन्यपानास मानसिक आधार

0
16
  • डॉ. मनाली महेश पवार

आईचे दूध हे बाळासाठी प्राथमिक अन्न आहे. पण विविध कारणांमुळे स्तन्यपान करणे प्रत्येक आईला शक्य होतेच असे नाही. काही अपथ्यकर खाण्या-पिण्यामुळे, अपथ्यकर विहारामुळे किंवा इतर आजारांमुळे ‘स्तन्यदुष्टी ‘देखील होत असते. ते ‘दूषित स्तन्य’ बाळासाठी त्रासदायक ठरू शकते. आज प्राकृत स्तन्यापासून दूषित स्तन्यापर्यंत सगळी माहिती जाणून घेऊ…

आईचे दूध हे तिच्या बाळासाठी प्राथमिक अन्न आहे हे आपणा सगळ्यांनाच माहीत आहे. पण विविध कारणांमुळे सध्या स्तन्यपान करणे प्रत्येक आईला शक्य होतेच असे नाही. त्यातही आईचे वय व अनैसर्गिक गर्भारपण ही स्तन्यउत्पत्तीमध्ये अडथळा आणणारी मुख्य कारणे आहेत. तसेच काही अपथ्यकर खाण्या-पिण्यामुळे, अपथ्यकर विहारामुळे किंवा इतर आजारांमुळे ‘स्तन्यदुष्टी ‘देखील होत असते. ते ‘दूषित स्तन्य’ बाळासाठी त्रासदायक ठरू शकते. आईचे दूध आणि बिघडू शकते? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे ना? तर हो, स्तन्य दूषितही होऊ शकते म्हणून त्यासाठी आज प्राकृत स्तन्यापासून दूषित स्तन्यापर्यंत सगळी माहिती पाहू.
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा ‘स्तन्यपान जागृती’साठी साजरा केला जातो. पण स्तन्यदोष असल्यास स्तन्यपान करू नये. स्तन्य देणे शक्य नसल्यास इतरांनी मानसिक आधार द्यावा. ‘दूधच नाही’, ‘दूध कमीच आहे’, ‘दूध खराब आहे’, ‘बाळाचे पोषणच होणार नाही’, ‘पुढे स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो’ अशा प्रकारची विधाने करून बाळंतिणीचे मानसिक खच्चीकरण करू नये. ही एक नाजूक अवस्था असते. त्यामुळे स्तन्यपानासाठी बाळंतिणीला प्रवृत्त करावे.
नवजात बालकाची वाढ जशी आईच्या दुधावर अवलंबून असते, त्याचप्रमाणे त्याचे आजारही चुकीच्या पोषणावर अवलंबून असतात. अर्थात, बालकाचा प्राथमिक आहार म्हणजे ‘आईचे दूध’ आहे, त्यामुळे आईचे दूधही दूषित होऊ शकते हे आयुर्वेदशास्त्राने स्पष्ट केले आहे.

आयुर्वेदशास्त्रानुसार ‘स्तन्य’ हे रसधातू व काहींच्या मते रक्तधातूचा उपधातू आहे. रसरक्त धातूचे चयपचय हे स्तन्यनिर्मितीचे मुख्य कारण आहे. मासिकपाळीप्रमाणेच स्त्रियांच्या आयुष्यात स्तन्याचा कालावधीही ठरलेला असतो. गर्भारपणापासूनच रसधातू पोषणयुक्त हवा. कारण रसरक्त धातू उत्तम असल्यास रज-आर्तव उत्तम राहतो व रज-आर्तव निरोगी, पोषणयुक्त असल्यास गर्भारपणात यातूनच स्तन्यनिर्मिती व गर्भाचे पोषण होते. म्हणूनच योग्य स्तन्यनिर्मितीसाठी गर्भावस्थेत महिलेने व्यवस्थित गर्भिणी परिचर्येचे पालन करावे.

प्राकृत स्तन्य ः आयुर्वेदशास्त्राप्रमाणे आईच्या दुधाचे एकूण प्रमाण दोन अंजली असते (1 अंजली अंदाजे 200 मि.ली.). त्या दृष्टिकोनानुसार सरासरी आईचे दूधउत्पादन दररोज 500-700 मि.ली. आहे. शुद्ध पांढरा रंग आणि मिसळल्यावर ते पाण्यात समरूप होते. त्यात एक वैशिष्ट्यपूर्ण गोड-मधूर वास असतो.
प्रसूतीनंतर आईचे दूध स्रवण्यासाठी

  • अपत्य स्पर्श ः बाळाचा आईला स्पर्श करवणे.
  • अपत्य दर्शन ः नवजात मुलाचे दर्शन.
  • अपत्य स्मरण ः बाळाचे स्मरण.
    नवजात बालकाला आईच्या जवळ धरणे म्हणजे स्तन्य स्रवण्यासाठी भावनिक घटक खूप महत्त्वाचा असतो. आजच्या काळात ‘हार्मोन्स’ जितके स्तन्यनिर्मितीसाठी महत्त्वाचे आहेत, तितकेच भावनिक घटकांनादेखील महत्त्व आहे. म्हणून स्तन्यक्षय म्हणजे आईचे दूध कमी स्रवत असेल तर अशा परिस्थितीत समुपदेशन अधिक फायदेशीर ठरते. आईच्या दुधावर बाळाचे संपूर्ण पोषण, वाढ अवलंबून असते, त्यामुळे स्तन्यपानाला अधिकाधिक महत्त्व द्यावे. आयुर्वेदशास्त्रात स्तन्याला जीवन, पुष्टीकर, वृद्धीकर, बलवर्धक, ओजस्कर म्हटलेले आहे.
  • ‘स्तन्य’ म्हणजे आईचे दूध योग्य प्रमाणात व शुद्ध येण्यासाठी बाळंतपणानंतर सूतिकेच्या आहार-विहाराला खूप महत्त्व आहे.
  • पहिले तीन दिवस शक्यतो मीठ देऊ नये. त्यामुळे संचित विषार उत्पन्न होत नाहीत.
  • या तीन दिवसांत पंचकोल चूर्ण गूळ आणि गरम पाण्याबरोबर द्यावे किंवा कातबोळ आणि गूळ यांची गोळी करून सकाळ-संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर द्यावी, म्हणजे स्तन्य शुद्ध होते व योनिशोधन उत्तम प्रकारे होते. त्याचबरोबर दशमुलाचा काढा द्यावा.
  • सुंठ, तूप, साखर, स्निग्ध यवागू किंवा रव्याचा भरपूर साजूक तूप घातलेला शिरा तिला द्यावा.
  • तीन दिवसांनंतर तिला वरणभात, मेथीची भाजी आणि तिखट न घातलेली लसणीची चटणी एवढा आहार द्यावा.
  • आयुर्वेदशास्त्रानुसार सातव्या दिवसानंतर हळूहळू सर्व जेवण द्यावे. म्हणजेच हा आहार नॉर्मल डिलिव्हरीसाठी, पण सिझेरिअन पेशंटसाठीही तेवढाच योग्य आहे.
  • बाराव्या दिवसापर्यंत सर्व जेवण तांब्याच्या तपेल्यात उकळलेले पाणी तापलेली लोखंडाची पळी बुडवून द्यावे किंवा सोन्याची वस्तू दहा मिनिटे उकळून ते पाणी पिण्यास द्यावे. याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • रक्तशोधनासाठी पहिले तीन दिवस एक चमचा जुना गूळ व अर्धा चमचा हळद सकाळ-संध्याकाळ द्यावी. जेवणानंतर ओवा, बाळंतशेपा, खोबऱ्याचा तुकडा असे खायला द्यावे.
  • कच्चा डिंक, तुपात खलवलेले केशर एक चमचा साजूक तुपाबरोबर तीन दिवस द्यावे. त्यामुळे रक्तवर्धन होते. त्यानंतर सुंठ + तूप + साखर असे मिश्रण सकाळी द्यावे. मग कच्च्या डिंकाचा लाडू पहिल्या दहा दिवसांत खावा.
  • कच्च्या डिंकानंतर खिरी द्याव्यात. या खिरींमुळे बालकाला सकस दुधाचा पुरवठा होतो.
  • खारीक- बदाम खीर, खसखस- बदाम खीर, अहळीवाची खीर, कापसाच्या सरक्यांची खीर, कणिक तुपात भाजून दूध घालून केलेली खीर अशा प्रकारे खिरी दिल्याने स्त्रीच्या पोटात दूध तर जातेच, शिवाय वायूचा उपशय होतो. बल प्राप्त होते. शरीराची झालेली झीज भरून निघते, बालकाला उत्तम दुधाचा पुरवठा होतो.
  • सूतिकेला खाण्यासाठी- भातासाठी- जुना तांदूळ वापरावा. सकाळचे खाणे झाल्याने स्त्रीला गाढ झोप लागते व थकवा भरून येण्यास मदत होते.
  • सकाळी अभ्यंग, परिषेक, स्नान, धूपन, स्वेदन आणि उदरवेष्टन, अशन (खाणे) व नंतर निद्रा असा स्त्रीचा उपक्रम असावा. बालकाने स्तन्यपान केल्यानंतर स्त्रीला भरपूर भूक लागली पाहिजे. म्हणून दुपारच्या जेवणात वरणभात, मेथी, दुधी, पडवळ यांपैकी भाजी, आमटी, गरमगरम पोळी तुपाबरोबर खाण्यास द्यावी. लसणीचे तिखट, मुरलेले लिंबाचे लोणचे द्यावे. जुन्या मुरलेल्या लिंबाच्या लोणच्यामुळे संचित क्लेद, संचित रज, जरायू शेष आणि ग्रंथिल श्वेतता, याचबरोबर नऊ महिन्यांपर्यंत साचलेला काळपट रजस्राव बाहेर पडून जाण्यास मदत होते आणि गर्भाशयाच्या अंतस्तत्वचेवरील साठलेला क्लेद बाहेर गेल्यामुळे गर्भाशय शुद्ध होते व त्याचबरोबर स्तन्य विशुद्ध होते.
  • बाळंतिणीच्या मधल्या वेळच्या खाण्यातही लसणीचा उपयोग करावा. उदाहरणार्थ, तांदळाची धिरडी, उकड, आंबोळी, तिखट मिठाचा सांजा यांत लसणीचा वापर करावा.
  • सुंठ, गूळ, तूप घातलेल्या सुंठीच्या वड्या, खसखस घालून केलेल्या आल्याच्या वड्या व बदाम घालून केलेल्या आल्याच्या वड्या द्याव्यात.
  • मेथी, सुंठ, आले, लसूण, जुने तांदूळ, ओवा, आवडत असल्यास बाळंतशेपा, बडिशेप या सर्वांचा वापर करून- रूचिपालट होऊन- पथ्यकर अन्न तिच्या पोटात जाईल असे पाहावे. यामुळे सकस आणि भरपूर दुधाचा पुरवठा बालकाला होतो.
  • साडेसाळीचे तांदूळ पचायला हलके असतात. याचा मऊ भात, मुगाच्या डाळीची मेथी घालून केलेली खिचडी अशा विविध प्रकारे वापर करावा.
  • खारकेची पूड ओल्या खोबऱ्याबरोबर सकाळी खावी व वर दूध प्यावे.
  • दुपारी तूप लावून पोळी किंवा बाजरीची भाकरी द्यावी. दूध दोन वेळा द्यावे किंवा कांजी, कढण द्यावे. याने बालकाला सकस दूध मिळते.
  • महिन्याभराने मेथ्या दळून ती पूड तुपात भिजत टाकावी. साजूक तुपावर कणिक भाजून, त्यात खसखस, बदाम, पिठीसाखर किंवा गूळ आवडीप्रमाणे घालून मेथ्यापूड फेसून लाडू करावेत आणि रोज एक या प्रमाणात खायला द्यावा.
  • पंधरा दिवसांनंतर तळलेल्या डिंकाचे लाडू, खारीक पूड, खोबरे, खसखस, बदाम, थोडा गूळ घालून लाडू वळावेत व ते द्यावेत.
    अशा प्रकारे योग्य तऱ्हेने बाळंतणीची काळजी घेतल्यास, आहार-विहाराचे नियोजन केल्यास स्तन्यनिर्मिती योग्य प्रमाणात होते, त्याचबरोबर कुठल्याच प्रकारची स्तन्यदुष्टी होत नाही.