>> विद्यार्थी आंदोलनाची परिणती; लष्कर अंतरिम सरकार स्थापन करणार
बांगलादेशात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आरक्षणविरोधी विद्यार्थी आंदोलनानंतर निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय परिस्थितीमुळे काल शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी देशही सोडला आहे. त्यामुळे अवामी लीग पक्षाचे सरकार कोसळले आहे. आता बांगलादेशी लष्कर देशात अंतरिम सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत या आंदोलनामुळे 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन चालू होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये 30 टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना 5 टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते. 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले 30 टक्के आरक्षण रद्द करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची होती. दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने 30 टक्के आरक्षण रद्द करून 5 टक्क्यांवर आणले; मात्र आंदोलनावेळी झालेल्या पोलिसी दडपशाहीमुळे हिंसाचार वाढतच चालला होता. यानंतर बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली; मात्र तरीही येथील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. बांगलादेशमधील इंटरनेट सेवाही अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाने रविवारी आणखी उग्र रुप धारण केले होते. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलक रस्त्यावर उतरले होते. 4 ऑगस्टला उसळलेल्या हिंसाचारात जवळपास 91 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शेख हसीना यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला होता.
या पार्श्वभूमीवर, बांगलादेश लष्कराचे प्रमुख वकार-उज-जमान यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषदेत शेख हसीना यांना जनतेच्या भावनांचा विचार करून राजीनामा देण्यास सांगितले होते. लष्कराने हसीना यांना राजीनामा देण्यास फक्त 45 मिनिटांचा वेळ दिला होता. त्यानंतर काही मिनिटातच हसीना यांनी राजीनामा दिला. देशातील सत्ता सध्या लष्कराने ताब्यात घेतली आहे. तसेच लष्कराकडून पुढील 24 तासांत अंतरिम सरकार स्थापन केली जाईल, असे वकार-उज-जमान यांनी म्हटले आहे.
आणखी 6 आंदोलकांचा मृत्यू
राजधानी ढाकामध्ये काल 4 लाख लोक रस्त्यावर उतरले होते. त्यातील काही आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसले आणि तोडफोड व जाळपोळ केली. सोमवारी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत सहा जण ठार झाले.
शेख हसीना भारतात
हिंसक वातावरणामुळे शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले. त्या लष्करी विमानाने बंगालमार्गे भारतात पोहोचल्या. त्यांचे विमान गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर उतरले. काल त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेतली. यानंतर त्या लंडन किंवा इतर कोणत्याही देशात जाऊ शकतात, अशी शक्यता आहे.
सीमेवर अतिदक्षता; रेल्वे सेवा बंद
बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहता भारताच्या सीमा सुरक्षा दला (बीएसएफ)ने भारत-बांगलादेश सीमेवर हायअलर्ट जारी केला आहे. तसेच भारताने बांगलादेशला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द केल्या.
पंतप्रधान निवासस्थानात आंदोलकांचा धुडगूस
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर ढाकामध्ये जमा झालेल्या आंदोलकांनी आपला मोर्चा पंतप्रधान निवासाकडे वळविला. 2022 साली ज्याप्रकारे श्रीलंकेत परिस्थिती दिसली होती, तशीच परिस्थिती ढाकामध्ये पाहायला मिळाली. आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरात घुसून धुडगूस घातला. वस्तूंची तोडफोड केली आणि महागड्या वस्तू चोरून नेल्या.
बिर्याणीवर ताव, ससे, मासेही पळवले!
शेख हसीना यांच्या घरातील स्वंयपाक घरात शिरत तेथील बिर्याणीवरही आंदोलकांनी ताव मारला, तर काही आंदोलकांनी घरे, खुर्च्या, चित्रेही पळवली. आंदोलकांनी घरातील प्राण्यांनाही सोडले नाही. ससे, मासे, राजहंस असे प्राणीही आंदोलकांनी पळविले. त्याचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.