सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली-रोणापाल हद्दीवरील जंगल परिसरात साखळदंडाने बांधून ठेवलेल्या ललिता कायी कुमार एस. या अमेरिकन महिलेच्या प्राथमिक जबाबानुसार बांदा पोलिसांनी सोमवारी रात्री तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला. सदर महिलेच्या पतीला ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची दोन पथके तिच्या तामिळनाडू येथील मूळ पत्त्यावर तपासासाठी गेली असून, त्यानंतरच या प्रकरणाची सत्यता समोर येणार आहे. तसेच त्या महिलेला सोनुर्लीच्या जंगलात कधीपासून बांधून ठेवली होती हेही समोर येणार आहे.
सोनुर्ली-रोणापाल हद्दीवरील जंगल परिसरात साखळदंडाने बांधलेल्या स्थितीत एक अमेरिकन महिला सापडल्याने खळबळ उडाली होती. रोणापाल-सोनुर्ली गावाच्या मध्यभागी असलेल्या कराडीचे डोंगर या घनदाट जंगलात ही महिला आढळून आली होती. तिच्या उजव्या पायाला साखळदंड घालून एका झाडाच्या बुंध्याला कुलुपबंद करण्यात आले होते. सोनुर्लीतील काहीजण गुरे चारण्यासाठी गेले असता त्यांना या महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर हा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, या महिलेसोबत घडलेल्या या घटनेची गंभीर दखल अमेरिकन दूतावासाने गंभीर घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाची दखल घेतल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.