सर्व बेकायदेशीर कॅसिनो बंद करणार : मुख्यमंत्री

0
10

राज्यातील सर्व बेकायदेशीर कॅसिनो बंद करण्यात येतील, असे आश्वासन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले. प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार विजय सरदेसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.
राज्यभरात बेकायदेशीर कॅसिनो चालू असून, स्लॉट मशिन्स घालून हे कॅसिनो सुरू करण्यात आलेले आहेत. गावागावात अळंब्याप्रमाणे उगवलेल्या या कॅसिनोमुळे मुले या जुगाराला बळी पडू लागली असल्याचे विजय सरदेसाई यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

विधानसभा अधिवेशन सुरू झाले आणि विधानसभेत या कॅसिनोचा प्रश्न उपस्थित केला की काही दिवस हे कॅसिनो बंद होतात; मात्र नंतर ते पुन्हा सुरू होत असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. आता तर श्रीलंकेतील कॅसिनोचालकांनीही गोव्यात आपली जाहिरात सुरू केली असून, होर्डिंग्जही उभारली असल्याचे त्यांनी सांगितले. या कॅसिनोचालकांवर कारवाई करावी, तसेच श्रीलंकेतील कॅसिनोचालकांचे पर्वरी येथील होर्डिंग्ज हटवा, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी बोलताना व्हेन्झी व्हिएगस यांनी, सर्व ठिकाणचे बेकायदेशीर कॅसिनो बंद करावेत. तसेच कॅसिनोचा ‘गावठी’ अवतार असलेल्या ‘गडगडो’वरही कारवाई केली जावी, अशी मागणी केली.

कॅसिनोंकडून 349 कोटी रुपये थकित

राज्यातील कित्येक पंचतारांकित हॉटेलात कायदेशीर कॅसिनो चालू असून, ते राज्य सरकारला 349 कोटी रुपये महसुलाच्या स्वरूपात देणे आहेत, असे विजय सरदेसाई यांनी काल सरकारच्या निदर्शनास आणून देऊन सरकारने हे पैसे वसूल करावेत, अशी मागणी केली. त्यावर, वर्षभरात हे पैसे वसूल करुन घेतले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.