- डॉ. सीताकांत घाणेकर
(योगसाधना ः 656, अंतरंगयोग- 242)
‘मौन’मागील तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे. फक्त शाब्दिक मौन नको तर मानसिक-आंतरिक मौन अभिप्रेत आहे. अनेकवेळा काही घटनांमुळे राग आला तर अनेक व्यक्ती बोलायचे लगेच बंद करतात. पण याचा अर्थ त्यांना आंतरिक शांती आहे असे नाही.
विश्वात विविध संस्कृती आहेत. काही फार पुरातन आहेत. त्या वेगवेगळ्या देशांत रुजल्या व प्रगत झाल्या. ग्रीक, रोम, भारत… या सर्व संस्कृतीत भारतीय संस्कृती फार पुरातन आहे. हजारो वर्षांपूर्वीची. पण आजतागायत ती टिकून आहे. विश्वाला मार्गदर्शन करीत आहे.
अवश्य, काही पैलू थोडे थोडे विसरले जातात, बदलले जातात. त्याला उपाय नाही. ती काळाची किमया आहे. काही विषयांचे पुनरुत्थान होते आहे ही भारतीयांना आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.
संस्कृत भाषा ः संस्कृत भाषेचा प्रसार व प्रचार विविध देशांत होत आहे. कारण ती अत्यंत प्रभावी भाषा आहे. शास्त्रज्ञांच्या मते संगणकासाठी संस्कृत अगदी योग्य भाषा आहे. जर्मनीसारख्या युरोपीयन देशांत संस्कृत शिक्षकांना मागणी आहे. मेंदूच्या विशिष्ट भागांची वाढ होण्यासाठी व मानवी जीवनाच्या पैलूसाठी संस्कृत उपयोगी आहे. संस्कृत अभ्यासामुळे स्मृती व बुद्धी दोहोंची वाढ होते असे संशोधनांती समजले आहे.
योग ः जवळजवळ पाच हजार वर्षांपूर्वीचे हे शास्त्र. थोड्या प्रमाणात काही व्यक्ती योगसाधना करीत होत्या. पण इसवी सन 2014 पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे 21 जून हा ‘वैश्विक योगदिन’ म्हणून साजरा केला जातोय. विश्वातील शेकडो देशांत लाखो व्यक्ती त्या दिवशी योगसाधना करतात.
आयुर्वेद ः हे एक उत्कृष्ट वैद्यकीय शास्त्र आहे. अनेक रोग जे इतर वैद्यकीयशास्त्रे बरे करू शकत नाहीत ते रोग शास्त्रशुद्ध आयुर्वेदामुळे बरे होऊ शकतात. उदा. मधुमेह, ॲलर्जी, दमा, रक्तदाब. कर्करोगासाठीदेखील या शास्त्रात उत्तम औषधे आहेत. बहुतेक औषधे वृक्ष-वनस्पतीपासून तयार केली जातात. हल्ली आयुर्वेदावर उत्कृष्ट संशोधन चालू आहे. भारतीय सरकारने ‘आयुष’ हा विभाग सुरू केल्यापासून या पाचही शास्त्रांचा उपयोग वाढत आहे- आयुर्वेद, योग, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी.
प्रत्येक शास्त्राच्या काही मर्यादा असतात तेव्हा दुसऱ्या शास्त्राचा उपयोग करावा लागतो. हल्ली जे विविध रोग वाढले आहेत त्यांच्या इलाजासाठी या शास्त्रांचा बरोबर उपयोग केला तर अनेक रोग आटोक्यात येतील. काही रोग संपूर्ण बरे होतात. या शास्त्राचे एकत्रीकरण करणे अनेकवेळा आवश्यक असते.
सर्व भारतीय शास्त्रांमध्ये एक मुख्य मुद्दा म्हणजे आपल्या भारतीय ऋषींनी विविध जीवनोपयोगी विषयांवर अभ्यास केला. तोदेखील सखोल. तद्नंतर चर्चा, चिंतन, आवश्यक संशोधन केले.
योगशास्त्रामध्ये तर पंचकोशांना महत्त्व दिले जाते- शारीरिक, प्राणिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक. म्हणून हे पाच कोश आहेत- अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय. विविध शास्त्रांमध्ये काही शब्द प्रत्येक क्षणी ऐकायला मिळतात- ध्यानधारणा, तपस्या, मौन… हे प्रत्येक पैलू आवश्यक व अतिमहत्त्वाचे आहेत. मौन तर समस्येवर योग्य तोडगा काढण्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच शास्त्रकार म्हणतात- ‘मौनं सर्वार्थ साधनम्।’
‘मौन’ हा शब्द जरी वरचेवर सोपा वाटला तरी त्यामागील तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे. फक्त शाब्दिक मौन नको तर मानसिक-आंतरिक मौन अभिप्रेत आहे. अनेकवेळा काही घटनांमुळे राग आला तर अनेक व्यक्ती बोलायचे लगेच बंद करतात. पण याचा अर्थ त्यांना आंतरिक शांती आहे असे नाही. कारण रागाच्या विचारांच्या प्रचंड लाटा अजूनही मनावर आदळत असतात. कितीतरी विचार चालू असतात.
अष्टांग योगामध्ये प्रत्याहार हे एक अंग आहे. त्यात कासव दाखवतात. काही संकट आले तर कासव आपले सर्व अवयव- तोंड, पाय- आपल्या कवचात ओढून घेतो. आतून तो परिस्थितीचा शोध घेतो व योग्यवेळी अवयव परत वापरायला सुरुवात करतो. मानव तर बुद्धिमान प्राणी आहे. त्याला मौनाचे तत्त्वज्ञान माहीत असायला हवे.
कठोर परिस्थितीमध्ये शब्दांचे दमन-वमन-शमन कसे करावे हे सुज्ञास माहीत हवे. दमन केले तर तब्येत बिघडते, वमन केले तर परिस्थिती बिघडते. म्हणून शमन योग्य असते. त्यावेळी प्रतिक्रिया नाही. कारण ती रागाने आलेली असू शकते. योग्यवेळी विचार करून प्रतिक्रिया दिलेलीच बरी.
काहीवेळा कुटुंबात काही व्यक्ती मौन धारण करतात. पण त्यांच्या वागण्यावरून ते मौन खोटे आहे ते कळते. उदा. भाडे जोराने गॅसवर ठेवणे, परात आपटणे वगैरे… मी अशा काही व्यक्ती बघितल्या आहेत की त्या तासन्तास, दिवसेंदिवस कुणाकडेही बोलत नाहीत. पण त्या व्यक्ती आतून शांत नाहीत हे कळते. त्यांच्या वागण्याचा सर्वांना त्रास होतो- जास्तकरून लहान मुलांना- हे एक प्रकारचे ‘ब्लॅकमेल’ असते.
मौनामध्ये आंतरिक शांती हवी. त्यामुळे दया व क्षमा आवश्यक आहे. म्हणून शास्त्रकार म्हणतात- दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती. आपण देवाकडे इतक्या गोष्टी बोलतो, तक्रारी करतो, मागण्या करतो. पण देव अगदी शांत असतो. तसेच व्यक्तीनेदेखील शांत राहिले तर देवाला आवडेल. परंतु हल्ली प्रत्येककडे गडबड, कोलाहलच जास्त दिसतो.
संत कबीर दोन ओळीत सारांश सांगतात-
मन मस्त हुआ तो क्या बोले?
मन मस्त हुआ तो क्यों बोले?
शास्त्रकार म्हणतात की संतुष्ट व्यक्ती बोलत नाही. उदा. शरीरात कुठे दुखले-खुपले असेल तर आपण अस्वस्थ होतो. पण शरीर स्वस्थ असेल तर आपण शांत असतो. म्हणूनच म्हणतात- ‘अस्वस्थता ही वाचाळता, स्वस्थता हे मौन।’ श्री. रवींद्रनाथ टागोर म्हणतात ः ‘मी समुद्राला विचारले, काय रे तू सारखा बोलतोस.’ समुद्र म्हणाला, ‘मी कुतूहलामुळे निर्माण झालेली वाचाळता आहे.’ मी हिमालयाला विचारले, ‘काय रे तू काहीच बोलत नाहीस?’ हिमालय म्हणाला- ‘कुतूहल संपल्यानंतरची ही शांतता आहे.’ अध्यात्मातील मौन हे कुतूहल संपल्यानंतरचे असते.
ज्ञानी प्रवचनकार यासंदर्भात एक छान दृष्टांत देतात- ‘महापुरुषांना कुतूहल नव्हते तरी ते बोलले. त्यांनी मौन सोडले.’ उदा. कृष्णा, बुद्ध, ज्ञानेश्वर. शुकमुनी राजा परीक्षिताला यासंदर्भात म्हणतात- ‘हे फक्त करुणेमुळे बोलले. अध्यात्मातील अतुच्च शिखराला पोचलेले हे महापुरुष. पण मानवाचे दुःख बघून त्यांना वेदना झाल्या. त्यांच्या करुणेपोटी ते बोलले.’
कुरुक्षेत्राच्या महायुद्धाच्या वेळी सर्वप्रथम मौन कृष्णाने मोडले. त्यांनी त्यांचा पांचजन्य शंख सुरुवातीलाच फुंकला. तद्नंतर इतर रथी-महारथींनी आपापले शंख फुंकले. तद्नंतर अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांनी मौन सोडले. जीवनाचे तत्त्वज्ञान अर्जुनाला समजावले. खरे म्हणजे अर्जुनाच्या डोक्याला आपला हात लावून त्याला सर्व ज्ञान ते देऊ शकले असते, पण त्यांनी अठरा अध्यायांची गीता सांगितली. कारण त्यांना वाटले की जर आता मौन धरले तर पुढे सर्व अवघड होणार. द्रष्टे असल्यामुळे त्यांना तिन्ही काळांचे- भूत, वर्तमान, भविष्य- ज्ञान होते. तसेच समाजाच्या अधोगतीची त्यांना व्यथा होती. शिवाय आपल्या वचनाचीही आठवण होती.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥
श्रीकृष्ण हे विष्णूचा अवतारच होते. तसे पाहिले तर अर्जुनाला निमित्त बनवून भगवंतानी सर्व मानवजातीला गीतेच्या माध्यमातून जीवनविकासासाठी आवश्यक ते तत्त्वज्ञान सांगितले. योगसाधकांनी ध्यानातील मौनात राहून अशा विचारांची अनुभूती घ्यायला हवी.