शेतकऱ्यांना 7 ऑगस्टपर्यंत नुकसानभरपाई

0
48

>>> गतवर्षी झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच देणार

काकडी, भेंडी, भोपळा, वांगी, कारली आदी भाज्या पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे जे नुकसान झाले आहे, ते लक्ष्यात घेऊन त्यांना नुकसानभरपाई म्हणून एक ठराविक व समान असा मदतनिधी लवकरच देण्यात येणार आहे. तसेच गेल्या वर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे भातशेती व अन्य शेतीचे जे नुकसान झाले आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी भरपाईसाठी अर्ज केलेले आहेत, त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम 7 ऑगस्टपर्यंत देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गोवा विधानसभेत दिली.

काल विधानसभेत आमदार नीलेश काब्राल यांनी मांडलेल्या एका लक्षवेधी सूचनेवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. काब्राल यांनी आपल्या लक्षवेधी सूचनेतून फर्मागुढी, बांदोडा व आजूबाजूच्या गावात, तसेच केपे तालुक्यात पावसाळी मोसमात जे शेतकरी काकड्या, कारली, वांगी, मुळ्याची भाजी, भोपळा, दोडकी, कोकण दुधी, झेंडूची फुले आदीचे पीक घेत असतात, त्या शेतकऱ्यांचे पीक यंदा कोसळणाऱ्या धो-धो पावसामुळे खराब झाले असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले, त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील आश्वासन दिले.

यावेळी कृषीमंत्री रवी नाईक हे उत्तर देण्यासाठी उभे राहिले असता, मुख्यमंत्र्यांनी त्यांना बसण्याची विनंती करून नंतर या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यात पावसाळ्यात मोसमी पीक घेणाऱ्या या छोट्या व गरीब शेतकऱ्यांप्रती सहानुभूती व्यक्त केली.
काब्राल यांनी मांडलेली लक्षवेधी सूचना ही अत्यंत महत्वाची आहे, असे विषद करून या लोकांना मदत देण्याची गरज आहे. या शेतकऱ्यांची स्वत:ची शेतजमीन नाही. त्यामुळे हे शेतकरी कोमुनिदादी अथवा भाटकाराच्या शेतात हे पीक घेत असतात. स्वत:ची जमीन नसल्याने त्यांना कृषी कार्डे मिळू शकत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांसाठीच्या योजनांपासूनही ते वंचित राहतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यंदाच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावांची यादी तयार करण्याचे काम विभागीय कृषी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात येईल आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर सर्वांना एकसमान असा मदत निधी वितरित केला जाईल, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गतवर्षीची नुकसानभरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याचे सभागृहात सांगितले. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे राज्यात भातशेती व अन्य प्रकारची शेती करणाऱ्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, त्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही, असे आलेमाव म्हणाले. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी नुकसानभरपाईसाठी अर्ज केले होते, त्यांना 7 ऑगस्टपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येणार असून, त्यांच्या खात्यात हा निधी जमा केला जाईल.
यावेळी आमदार एल्टन डिकॉस्टा, कार्लुस फेरेरा व व्हेन्झी व्हिएगस यांनीही काही महत्त्वाच्या सूचना केल्या.

केरळच्या धर्तीवर एक वेगळी योजना आखा : सरदेसाई
छोट्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केरळ सरकारने एक वेगळी योजना केलेली आहे. तशा प्रकारची योजना गोवा सरकारने तयार केल्यास या शेतकऱ्यांना त्या योजनेचा मोठा लाभ होऊ शकेल. शिवाय त्यांच्यासाठी पीक विमा योजनाही करता येईल, अशी सूचना विजय सरदेसाई यांनी यावेळी केली. त्यावर उत्तर देताना ते करण्यास विलंब लागेल; पण कालांतराने तेही करू, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.