>> विरोधी आणि सत्ताधारी आमदारांकडून कदंब सेवेतील त्रुटींवर बोट;
>> ग्रामीण भागांत बससेवा त्वरित सुधारण्याची मागणी
काल गोवा विधानसभेत वाहतूक, पंचायत आणि उद्योग खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी विरोधी आमदारांसह सत्ताधारी आमदारांनी देखील राज्यातील कदंब महामंडळाची सार्वजनिक वाहतूक सेवा कोलमडल्याचे निदर्शनास आणून दिले. अपुऱ्या बसगाड्या आणि अनियमित फेऱ्या यामुळे कदंबची सेवा बेभरवशाची झाली आहे. अनियमित सेवेमुळे नागरिक, नोकरवर्ग आणि विद्यार्थ्यांचे हाल होत असून, कदंबच्या सेवेत लवकरात लवकर सुधारणा करण्याची मागणी बहुतांश आमदारांनी केली.
राज्य सरकारने खासगी बसगाड्या भाडेपट्टीवर घेण्यासाठी माझी बस योजना प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित केली. या योजनेखालील खासगी बसमालकांना देण्यात येणाऱ्या भाडे दरात वाढ करण्याची गरज असून, त्यांची सेवा नियमित करण्याची गरज आहे. कदंब महामंडळाकडे बसगाड्याची संख्या अपुरी असेल, तर खासगी बसगाड्या भाड्याने घेऊन त्या उपलब्ध करण्याची गरज आहे, असेही आमदार नीलेश काब्राल यांनी सांगितले.
कुडचडे येथील बसस्थानकाचे काम प्रलंबित आहे. बसस्थानकासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. कुडचडे हा भाग धारबांदोडा, सांगे आणि केपे या भागासाठी मध्यवर्ती भाग असल्याने नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे ते लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी काब्राल यांनी केली.
ग्रामीण भागातील सार्वजनिक बससेवा योग्य नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कदंबच्या बससेवेत सुधारणा करण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केली.
हळदोणा मतदारसंघातील सार्वजनिक बससेवेत सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे. आापल्या मतदारसंघातून वाहतूक करणाऱ्या प्रवासी बसगाड्या अनियमित असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मतदारसंघातील रस्ते अरुंद असल्याने लहान आकाराच्या बसगाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी आमदार कार्लुस फेरेरा यांनी केली.
कदंब बसगाड्यांची संख्या अपुरी : डॉ. शेट्ये
डिचोलीसारख्या ग्रामीण भागात कदंब बसगाड्यांच्या अभावामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा कोलमडलेली आहे. या भागात कदंब महामंडळाच्या बसगाड्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे नागरिकांना तासन्तास बसगाड्यांच्या प्रतीक्षेत राहावे लागते, असे डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले. डिचोली बसस्थानकाचा प्रश्न गेली तीन वर्षे प्रलंबित आहे, तो मार्गी लावावा, अशी मागणीही त्यांनी केली.
विद्यार्थी, नागरिकांचे बसअभावी हाल
सांतआंद्रे मतदारसंघात सार्वजनिक प्रवासी बसगाड्याची समस्या कायम आहे. कदंब महामंडळाकडून प्रवासी बससेवा मिळत नाही. शालेय विद्यार्थी व नागरिकांना अपुऱ्या बसगाड्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पणजी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सध्या बंद ठेवलेल्या ईव्ही बसच्या फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी आमदार वीरेश बोरकर यांनी केली. कदंब महामंडळाच्या बसगाड्यांची योग्य देखभाल केली जात नाही. त्यामुळे कदंबच्या बसगाड्या रस्त्यावर बंद पडतात, असेही त्यांनी सांगितले.